मनसे गावोगाव करणार लाडू वाटप ! कारण वाचून अवाक् व्हाल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – इंधन दरवाढी विरोधात विरोधी पक्ष आणि नागरिकांकडून अनेक प्रकारची आंदोलनं केली जात आहेत. निषेध, निदर्शन, मोर्चा, बैलगाडी मोर्चा वगैरे आंदोलनं नेहमीच पाहायला मिळतात. परंतु मनसेच्या पारनेर तालुका शाखेनं वेगळंच आंदोलन पुकारलं आहे. पेट्रोलच्या दरवाढीनं शंभरी गाठल्याच्या निषेधार्थ गावात लाडू वाटप करून दरवाढ आणि भाजप सरकारचा निषेध करण्यात येणार आहे.

मनसेच्या पारनेर तालुका शाखेच्या वतीनं आता आंदोलन करण्यात येणार आहे. दरवाढ व भाजप सरकार विरोधात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मारुती रोहोकले यांच्या नेतृत्वाखाली येत्या गुरुवारी (दि 18 फेब्रुवारी) रोजी भाळवणी येथे नागेश्वर मंदिर देवस्थान ते भाळवणी बस स्टॉप तसंच बाजार परिसरात लाडू वाटप करण्यात येणार आहे. फटाके वाजवून पेट्रोलच्या दरानं शंभरी पूर्ण केल्यामुळं उपरोधिकपणे शतकपूर्तीचा उत्सव साजरा केला जाणार आहे.

याबाबत बोलताना रोहोकले म्हणाले, सध्या महाराष्ट्र राज्य आणि देशात पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ दिवसागणिक प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. या दरवाढीमुळं महागाई प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यात सर्वसामान्य माणूस होरपळला जात आहे. देशात पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात अनेक आंदोलनं सुरू आहेत. आम्ही याचा वेगळ्या पद्धतीनं निषेध करणार आहोत.

पुढं बोलताना ते म्हणाले, गुरुवारी सकाळी भाळवणी येथे नागेश्वर मंदिरापासून लाडू वाटपाचा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून ठेवण्यात आला आहे. लोकांना दरवाढीची जाणीव करून देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. मनसेतर्फे आम्ही तालुक्यात नेहमी वेगळ्या प्रकारची आंदोलनं करतो. त्याचप्रमाणे या गंभीर प्रश्नाकडं लक्ष वेधण्यासाठी हे लाडू वाटप आंदोलन करण्यात येणार आहे.

मनसेचे पारनेर शहरप्रमुख वसिम राजे, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे, पारनेर तालुका अध्यक्ष बाळासाहेब माळी, नितीन म्हस्के, पप्पू लामखडे, अशपाक हवालदार, अविनाश पवार, सतीश म्हस्के, महेंद्र गाडगे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.