‘मनसे’चा तृप्ती देसाईंना कडक ‘इशारा’, इंदुरीकरांना काळं फासण्याचा प्रयत्न केला तर…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गर्भलिंग निदान वक्तव्यावरून अडचणीत आलेल्या इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झाला नाही तर काळं फासू असा इशारा भूमाता ब्रिगेडने दिला आहे. भूमाता ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर आता मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावरून रान उठवलं गेलं, इंदुरीकर महाराजांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. तरीही त्यांना काळं फासण्याचा प्रयत्न केल्यास त्या शूर्पणखा महिलेचे नाक कापू असा इशारा मनसेच्या पुणे महिला शहराध्यक्ष रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिली आहे.

याबाबत बोलताना रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या की, समाजातील वाईट प्रवृत्तींविषयी इंदुरीकर महाराजांनी अनेकदा प्रबोधन केलं. इंदुरीकर महाराजांनी अनेकांचे संसार बसवले आहेत. हे सगळ्या महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर आहे. मात्र, आज एका शूर्पणखा महिलेने चार दिवसांत गुन्हा दाखल न झाल्यास त्यांना काळं फासू असा इशारा दिला आहे. ते अत्यंत निंदनीय आहे. तसेच स्त्री असण्याचा गैरफायदा आहे, असं सांगत तृप्ती देसाईवर निशाणा साधला आहे.

तृप्ती देसाई यांच्या इशाऱ्यानंतर मनसेच्या पुणे महिला शहराध्यक्ष रुपाली ठोंबरे पाटील यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी तृप्ती देसाई यांचा खरपूस समाचार घेतला आहे. रुपाली ठोंबरे पाटील आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाल्या, ‘आता हे खूप अति होतंय, तू येच ग शूर्पणखा, कोणाच्या तोंडाला काळे फासले जाते ते ते बघ तुझ्या उघड्या डोळ्यांनी’ असा इशारा त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिला आहे.