‘भाजप’ युतीवरून ‘मनसे’चे पुन्हा मोठं ‘विधान’ !

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून मनसे पक्षाचा झेंड्याचा रंग बदलणार अशी चर्चा सुरु असतानाच भाजप आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असल्याची चर्चा रंगू लागली. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने या चर्चेला आणखीनच रंग चढला. मात्र, मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी भाजप आणि मनसे युती होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
बाळा नांदगावकर यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, मनसे भाजपसोबत युती करणार नाही. त्यामुळे आगामी काळात मनसे स्वबळावरच राजकारणात सक्रीय राहणार असल्याचे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले आहे.

बाळा नांदगावकर यांनी यापूर्वी राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू नसतो असे विधान केले होते. त्यामुळे भाजप मनसे भविष्यात येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाली होती. त्यामुळे भाजप-मनसे आगामी काळात एकत्र येणार असल्याचे सांगण्यात येत होते. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मनसेने विचार आणि कार्यपद्धती बदलली तर भविष्यात आम्ही विचार करू असे मत व्यक्त केले होते. येत्या 23 जानेवारीला मनसेचे महाअधिवेशन होत आहे. या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवी भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सीएए विरोधात राज्यात सुरु असलेल्या आंदोलनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. तसेच नवी सरकारची कामगिरी यावर देखील ते भाष्य करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमीक्री करून त्यांची आगपाखड केली होती. त्यामुळे या अधिवेशनात आता पुन्हा भाजप आणि महाविकास आघाडीच्या सरकारवर निशाणा साधणार का हे लवकरच समोर येईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/