मनसे लोकसभा निवडणूक लढणार नाही ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नवीन समीकरणे समोर येण्याची शक्यता असतानाच मनसेच्या बाबत नवीन वृत्त समोर आले आहे. मनसेला लोकसभा निवडणूक लढण्यात रस नाही तसेच मनसेचे लक्ष विधानसभा निवडणुकीवर आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मनसे लोकसभा निवडणूक लढणार का ? याबाबत गडद प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

काँग्रेसच्या महाआघाडीत मनसेला सामावून घेण्याकडे शरद पवार यांचा ओढा आहे. तर काँग्रेसमधील काही नेते यासाठी इच्छुक नाहीत. कारण मनसेला काँग्रेसमध्ये सामावून घेतल्यास काँग्रेसच्या राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्याला बाधा पोचू शकतो आणि उत्तर भारतात काँग्रेसच्या मतावर परिणाम देखील होऊ शकतो म्हणून मनसेचे काँग्रेस आघाडीत समाविष्ठ होणे जरा कठीणच आहे. अशा सर्व घडामोडीवर राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाऊन अपयशी होण्यापेक्षा पूर्ण ताकदीने विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करण्याचे ठरवले आहे.

२०१४ ची लोकसभा निवडणूक झाल्यानंतर राज ठाकरे यांनी इथून पुढे मनसे लोकसभा निवडणूक लढणार नाही अशी देखील घोषणा केली होती. मात्र आगामी लोकसभेची रणधुमाळी सुरु होतातच मनसे कार्यकर्त्यांना त्यांनी तयारीचे आदेश देखील दिले होते. तसेच मागील काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी अजित पवार यांची गुप्त भेट सुद्धा  घेतली होती. अशा राजकीय हालचाली नंतर मनसेला स्वबळावर  लढण्याची वेळ आली तर मनसे लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापेक्षा विधानसभा निवडणूकच मोठया ताकदीने लढण्याचा पर्याय निवडू शकते.