Nagar News : शरद पवारांच्या नगर दौऱ्यात मनसे झळकावणार ‘हे’ बॅनर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे नगर दौऱ्यावर येणार आहे. शरद पवार यांच्या नियोजीत 24 जानेवारीच्या दौऱ्यात ते एका खासगी हॉस्पिटलचे लोकार्पण करणार आहेत. मात्र, शरद पवार यांच्या दौऱ्याच्यावेळी मनसे ‘पवार साहेब खासगी हॉस्पिटलने लुटमार केलेल्या वाढीव बिलांची रक्कम रुग्णांना परत मिळवून द्या’, अशा आशयाचे बॅनर शरद पवार ज्या मार्गाने जाणार आहेत, त्या मार्गावर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती, मनसे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी दिली.

नितीन भुसारे यांनी सांगितले की, कोरोना काळात ज्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांची वाढीव बिलाची रक्कम परत मिळावी यासाठी निवेदने देण्यात आली. तसेच उपजिल्हाधिकारी यांच्या समितीने कोरोना काळातील संपूर्ण बिलांची तपासणी करुन आतापर्यंत 14 ते 15 खासगी हॉस्पटलकडून जवळपास एक कोटी रुपये वसुलीचे आदेश महापालिकेला दिले आहेत. हे पैसे संबंधित रुग्णांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आदेश महापालिका आयुक्त, आरोग्य अधिकारी यांनी सर्व हॉस्पिटलला दिले होते. मात्र, या आदेशाला सर्वच हॉस्पिटलने केराची टोपली दाखवली असल्याचे भुतारे यांनी सांगितले.

महापालिकेने देखील वाढीव बिलांची रक्कम परत न दिल्यामुळे कोणत्याही प्रकारची कारवाई या संबंधित हॉस्पिटलवर केली नाही. कोरोना आजारात गोरगरीब जनतेला सरकारी रुग्णालयात बेड मिळत नव्हते, त्यामुळे नाईलाजस्तव खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले व त्यांच्याकडून लाखो रुपयांचे बिले या खासगी हॉस्पटीलने वसूल केली, असा आरोप त्यांनी केला आहे.

हॉस्पिटल्सनी नियमाप्रमाणे बिल न घेता गोरगरीबांची लुटमार केली. यामुळे मनसेच्यावतीने मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री यांना निवेदन पाठवले. मात्र कोणीच या कडे लक्ष दिले नाही. रविवारी महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यावेळी खासगी हॉस्पिटलचा वाढीव बिलाचा प्रश्न मांडण्यासाठी मनसे पवार येणार आहेत त्या मार्गावर ‘पवार साहेब गोरगरीब जनतेची करोना आजारावरील वाढीव बिलांची रक्कम परत मिळवून द्या’, असे बॅनर लावणार आहे.

मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ व शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर यांच्या सूचनेनुसार हे बॅनर लावण्यात येणार असून पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज राऊत, महिला उपजिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अनिता दिघे, रस्ते आस्थपन जिल्हाध्यक्ष विनोद काकडे यांच्यासह सर्व मनसेचे उपशहर अध्यक्ष, विभाग अध्यक्ष व कार्यकर्ते नियोजन करणार असल्याची माहिती भुतारे यांनी दिली.