बोगस बियाण्यांच्या मुद्द्यावर मनसेचा राडा, लातूरच्या कृषी सहसंचालक कार्यालयाची तोडफोड

पोलिसनामा ऑनलाईन टीम – खरीपातील सोयाबीनचे बियाणे खराब असल्यावरुन लातूर जिल्ह्यात तब्बल सहा हजारांपेक्षा जास्त तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. बियाणं उगवलेच नसल्याने हजारो शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. यावरुन मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी कृषी विभागाला आंदोलन करण्याचा इशारा दिला. मात्र याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने पाहिले नाही. मनसे शेतकरी सेनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी सहसंचालकांचे कार्यालयच फोडले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी लातूर कृषी संचालक कार्यालयात तुफान राडा करत तोडफोड केली. या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शेतकर्‍यांना नुकसानभरपाईपोटी हेक्टरी 25 हजार रुपये देण्याची मागणी मनसेने केली आहे. साडेआठ हजार क्विंटल बियाणे उगवले नाही. कृषी विभागामार्फत 12 कंपन्यांच्या विरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

महाबीजने बियाणे बदलून देण्याची तयारी दाखवली आहे तर खासगी कंपन्यांनी पेरणीचा खर्च देण्याची तयारी दाखवल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले असले तरी वस्तुस्थिती मात्र भिन्न आहे. खासगी कंपन्या भरपाई द्यायला तयार असतील तर तोच न्याय महाबीजला का नको? असा प्रश्न आहे. आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे.