लोकसभा निवडणूक २०१९ : मनसेचा एकमेव आमदारही मातोश्रीवर 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी निवडणुकींच्या आधीच मनसेला मोठा झटका बसणार असल्याचे दिसत आहे. मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे मनसेच्या इंजिनमधून उतरून शिवसेनेच्या शिवबंधनात बांधल्या जाणार असल्याची चर्चा आहे.

आगामी लोकसभा – विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. दरम्यान सर्वच पक्षांनी जोरदार तयारीही सुरु केली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी शिवसेना भाजपने सर्व हेवेदावे बाजूला सारून युतीची घोषणा केली. इतकेच नव्हे तर. दोन दिवसांपूर्वी  शिवसेनेचे नेते ,अभिनेते, डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला राम राम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला. याचबरोबर आता २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले मनसेचे एकमेव जुन्नर विधानसभा मतदार संघाचे आमदार शरद सोनवणे यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

आमदार शरद सोनवणे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे ते निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मनसेचे एकमेव आमदार पक्षाला राम राम ठोकणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत.
विशेष म्हणजे, शरद सोनवणे हे याआधी शिवसेनेतच होते मात्र त्यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी मनसेत प्रवेश केला होता आणि २०१४ च्या विधान सभा निवडणुकीमध्ये जुन्नर विधानसभा मतदार संघामधून विजय मिळवला होता.
याचबरोबर, आमदार शरद सोनवणे यांना पक्षात घेण्यास तीव्र विरोध शिवसैनिक करत असल्याचे समोर आले आहे. जुन्नर तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी बाहेरचा उमेदवार शिवसैनिक स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. इतकेच नव्हे तर, शरद सोनवणे यांना आमची भूमिका ऐकून न घेता उमेदवारी दिली तर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आपापल्या पदाचा सामूहिक राजीनामा देतील असा इशाराही त्यांनी दिला.