Amazon, Flipkart ला मनसेचा इशारा, App मराठीत सुरू करा, अन्यथा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –    सध्या सणांच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टनं मोठ्या सेलचं आयोजन केलं आहे. इंग्रजी, हिंदी आणि दक्षिणेतील काही भाषांसह हे अ‍ॅप भारतात काम करतं. परंतु या अ‍ॅपसाठी मराठी भाषेचा वापर केला जाताना दिसत नाही. त्यामुळं आता मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे.

अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांनी येत्या 7 दिवसात त्यांचं अ‍ॅप मराठी भाषेत सुरू करावं अन्यथा त्यांची दिवाळी मनसे स्टाईलनं होईल असा इशारा मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी दिला आहे. “अ‍ॅमेझॉन व फ्लिपकार्ट या बँगळुरू स्थित कंपन्यांची दक्षिणी भाषांना प्राधान्य देत महाराष्ट्रात मराठी भाषेला डावललं आहे. तरी आज @Flipkart @amazonIN या कंपनी व्यवस्थापनाला त्यांच्या मुख्य कार्यालयात जाऊन @mnsadhikrut दणका दिला.” असं ट्विट चित्रे यांनी केलं आहे.

 

अ‍ॅमेझॉन कंपनीला महाराष्ट्रात मराठी भाषा डावलल्याबद्दल समज दिली. तसंच यापुढं अ‍ॅमेझॉन कंपनीला महाराष्ट्रात काम करायचं असेल तर मराठी भाषेचा सन्मान केलाच पाहिजे अशी ताकीदसुद्धा दिली. जोपर्यंत महाराष्ट्रात राज ठाकरे  आहेत तोपर्यंत मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या कुठल्याही कंपनीला सोडणार नाही असं मनसेचे संयुक्त सरचिटणीस सचिन यशवंत गोळे यांनी म्हटलं आहे,

गोळे यांनी अ‍ॅमेझॉनच्या कार्यालयात जाऊन कंपनीतील अधिकाऱ्यांना माफी मागण्यासही भाग पाडलं. मराठी भाषेचा वापर न केल्यामुळं अगोदर माफी मागा अन्यथा मनसे स्टाईल दाखवू असा इशाराही मनसेनं दिला होता. त्यानंतर कंपनीतील अधिकाऱ्यांनी माफी मागितली आहे. लवकरच वरिष्ठांशी बोलून मराठी भाषेतही कंपनीकडून व्यवहार करण्यास सुरुवात होईल असं आश्वासनही देण्यात आलं आहे.