ऑनलाइन स्कुल फी साठी निश्चित धोरण ठरवण्याची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद असून शाळांकडून विद्यार्थ्याना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. आशा काळात देखील काही शाळा पालकांवर शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी दबाव टाकत आहेत. विद्यार्थी प्रत्यक्षात शाळेत जात नसताना देखील नियमित शाळेप्रमाणे शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने आता ऑनलाइन शाळांबाबत धोरण निश्चित करावे, अशी मागणी होत आहे. पुणे शहरातील अनेक शाळा पालकांवर दबाव टाकून फी वसूल करत आहेत. त्यामुळे पालकांवर नाहक आर्थिक बोजा निर्माण होत असून, त्यातून त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहेत.

ऑनलाइन शाळांसाठी देखील या शाळा नियमित शाळांच्याप्रमाणे शुल्क आकारणी करत आहेत. परिणामी अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा शाळांवर कारवाई कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी ही मागणी केली आहे.

तसेच त्यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे मागणी करत ज्या शाळा पालकांकडे फी भरण्यासाठी तगादा लावत आहेत, अशा शाळांची यादी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे दिली असल्याची माहिती यादव यांनी दिली. सध्या फीसाठी तगादा लावणाऱ्या शाळांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांना देणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कल्पेश यादव यांना चर्चे दरम्यान दिली.