Pune News : पूर्ववैमनस्यातून टोळक्याकडून प्राणघातक हल्ला

येरवडा : पोलीसनामा ऑनलाईन – शुभम जगन्नाथ शेंडगे या युवकावर दहा ते बारा जणांच्या टोळक्याने हल्ला केला आहे. यात शुभम गंभीर जखमी झाला आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून करण्यात आला आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी दहा ते बारा जणांविरुद्ध जमाव जमवून सशस्त्र दहशत माजवत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर गुन्ह्यातील पाच संशयित आरोपींना येरवडा पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

काय घडले नेमके
बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शुभम हा त्याचा मित्र आदेश जगताप याच्यासोबत शेलारचाळ या ठिकाणी सुट्टे पैसे आणण्यासाठी गेला होता. आरोपी मागील काही दिवसांपासून जुन्या भांडणाच्या रागातून आदेशचा पाठलाग करत होते. मात्र त्याचवेळी आरोपींनी शेलारचाळ येथे लोखंडी रॉड, तलवार व कोयत्याने शुभमवर वार करत त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यानंतर आरोपींनी दहशत माजवत त्या ठिकाणावरून पळ काढला.

या हल्ल्यात शुभम गंभीर जखमी झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत रात्री उशिरापर्यंत पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले. या गुन्ह्यात काही अल्पवयीन आरोपींचा देखील समावेश आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर करपे यांच्याकडून करण्यात येत आहे.