पुण्यात विसर्जन मिरवणुकीला गालबोट, पोलिसांच्या अंगावर गुलाल टाकून धक्काबुक्की

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन मिरवणुका सुरु असून या मिरवणुकीला गालबोट लागले आहे. एका गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये पोलिसांवर गुलाल टाकून त्यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली. या घटनेमुळे काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. तर आणखी एका घटनेत गणपती विसर्जन करण्यासाठी तलावात उतरलेल्या एका तरूणाला अग्निशमन दलाच्या जवांनी आणि जीवरक्षकांनी वाचवले. तर तिसऱ्या घटनेत बोट उलटल्याने बुडणाऱ्या तिघांना वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

पुण्यातील मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती लक्ष्मी रोडवर विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला. यावेळी मंडळाच्या अती उत्साही कार्यकर्त्यांनी प्रमाणापेक्षा जास्त गुलालाची उधळण केली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना गुलालाची उधळण न करण्याची विनंती केली. मात्र, काही कार्यकर्त्यांनी पोलिसांचे न ऐकता त्यांच्याच अंगावर गुलाल फेकला. तसेच पोलिसांना धक्काबुक्की केली. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला.

वृद्धेश्वर घाटाजवळ गणेश विसर्जन करत असताना एक तरुण बुडाला. यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आरडा ओरडा केला. अग्निशमन दालाच्या जवानांनी आणि जीवरक्षकांनी तात्काळ पाण्यात उड्या मारून तरुणाचे प्राण वाचवले. अग्निशमन दलाचे जवान एकनाथ कुंभार, गणेश शिंदे आणि जीवरक्षक भास्कर सुर्वे, विकी खंडागळे, गणेश जाधव, मंगेश सुपेकर आणि चौगुले यांनी या तरुणाला वाचवलं. तर सायंकाळी सहाच्या सुमारास अमृतेश्वर घाटावर एक बोट पाण्यात उलटल्याने तीन जण बुडाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात उड्या मारून बुडणाऱ्या तरुणांना वाचवले.

Loading...
You might also like