अरे बाप रे….मोबाईलशी खेळताना बॅटरीचा स्फोट, मुलाची बोटे तुटली

जालना: पोलीसनामा आॅनलाईन

तुम्ही जर तुमचा मोबाईल मुलाच्या हातामध्ये देत असाल तर सावधान….. कारण मोबाईल गरम होऊन बॅटरीचा स्फोट होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. जालन्यात मोबाईल बॅटरीशी खेळताना स्फोट झाल्याने, दहा वर्षाच्या मुलाला आपल्या हाताची बोटं गमवावी लागली आहेत. जालना जिल्ह्यातील कोकाटे हदगाव या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली असून, उमेश राठोड असे स्फोटात जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. तो आपल्या लहान भावासोबत खेळत होता त्यावेळी ही घटना घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आई-वडील घरी नसताना दुपारी मुलं बॅटरी फोडण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी बॅटरीचा अचानक स्फोट झाल्यानं मोठ्या मुलाची बोटं तुटली. स्फोट एवढा भीषण होता त्यामध्ये उमेशचा अंगठा आणि त्या शेजारचे बोट अक्षरश: फुटले. इतकंच नाही तर त्याच्या चेहऱ्यालाही दुखापत झाली आहे. दरम्यान, त्याच्यावर आैरंगाबाद येथील खाजगी रुग्णालायात उपचार सुरू आहेत.