Kolhapur News : कळंबा कारागृहात मोबाईल, गांजा टाकणाऱ्या गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश; चौघांची नावे निष्पन्न

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या संरक्षण भिंतीवरून बेकायदेशीरपणे मोबाईल व गांजा फेकणाऱ्या गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करण्यात कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले. चौघांची नावे निष्पन्न झाली असून, त्यापैकी ऋषिकेश सदाशिव पाटील (रा. कोदवडे, ता. राधानगरी) या पैलवानाला ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यातील चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले. सीसीटीव्हीच्या मदतीने हा छडा लागला, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भिष्म्या ऊर्फ भीम्या सुभेदार चव्हाण (रा. रांजणी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली), राजेंद्र ऊर्फ दाद्या धुमाळ (रा. रेल्वे स्टेशननजीक, जयसिंगपूर), ऋषिकेश सदाशिव पाटील (२५, रा. कोदवडे, ता. राधानगरी, सध्या रा. गंगावेश, कोल्हापूर), जयपाल किसन वाघमोडे (रा. वडिये, ता. कडेगाव, जि. सांगली, सध्या रा. गंगावेश, कोल्हापूर). असे निष्पन्न झालेलया संशयितांची नावे आहेत.

पोलीस अधीक्षक बलकवडे म्हणाले, दि. २२ डिसेंबर २०२० रात्री सव्वा वाजता भिष्म्या चव्हाण व राजेंद्र धुमाळ हे दोघे चारचाकी वाहनातून गंगावेशमध्ये आले. तेथील एका तालमीतील ऋषिकेश पाटील व जयपाल वाघमोडे यांना घेऊन कळंबा कारागृहानजीक गेले. तेथे राजेंद्र धुमाळ याने दहा मोबाईल, गांजा, मोबाईल चार्जर, पेनड्राईव्ह असे तीन गठ्ठे करून कारागृहाच्या संरक्षण भिंतीवरुन आत फेकले. चौकशीत पोलिसांनी मंगळवारी गंगावेश येथून ऋषिकेश पाटील याला ताब्यात घेतल्यानंतर हा उलगडा झाला. गुन्ह्यात वापरलेले वाहनही पोलीसांनी जप्त केले.

कळंबा कारागृहात मोबाईलसह गठ्ठे टाकलेल्या गाडीचे फुटेज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. शहरातील सेफ सिटीच्या सीसी कॅमेऱ्याचे फुटेज कॅमेऱ्यात गाडीचा नंबर अस्पष्ट दिसल्याने खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आधार घ्यावा लागला. संशयितांची गाडी कोठून कोठे गेली, हे निष्पन्न झाले.कोल्हापुरात पैलवानकी करण्यासाठी अनेकजण बाहेरून येतात.परंतु काही मोजकेच असे पैलवान गुन्हेगारी क्षेत्राकडे वळले आहेत. या गुन्ह्यामध्ये दोन पैलवानांचा सहभाग असल्याचे तपासात समजले. त्यातील ऋषिकेश पाटील व जयपाल वाघमोडे हे दोघे पैलवान गंगावेश परिसरातील तालमीत राहत असल्याचे तपासात निष्पन्न झालेआहे.

संशयित वाहनाचा तपास करत असताना पोलीस नाईक बालाजी पाटील यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरात पैलवानकी करणारा ऋषिकेश पाटील याच्या मदतीने जयसिंगपूर व सांगलीतील संशयितांनी येऊन मोबाईल फेकण्याची माहिती समोर आली. त्यातून हा उलगडा झाला. तपासात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचेपोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहा.पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनीही तपासात विशेष परिश्रम घेतले.

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, कोल्हापुरातील पाळेमुळे खणून काढणार, मोक्का कारवाईतील कळंबा कारागृहातील संशयित विकास खंडेलवाल (रा. इचलकरंजी) याच्यासाठी मोबाईल आत फेकल्याचे निष्पन्न झाले. संशयितांपैकी एकाला ताब्यात घेतले असून, इतर संशयितांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी गुन्हेगारांची साखळी उघडकीस आणणार असून, कारागृहातील कोणाचा यात सहभाग आहे का? याचीही कसून तपास करून प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचणार असल्याचे अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.