‘ही’ कंपनी देतीय ‘वर्क फ्रॉम होम’ करणार्‍यांना मिळणार 40 हजार रूपये

नवी दिल्ली : करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरातून अर्थात वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. याची सुरुवात गुगलने केली, त्यानंतर फेसबुकने आणि अन्य आयटी कंपन्यांनीसुद्धा वर्क फ्रॉम होमची सुरू केले. सुरुवातीला पुन्हा पुन्हा तीन-तीन महिन्यांची वाढ दिल्यानंतरही करोनाचा धोका कमी न झाल्याने अनेक कंपन्यांनी डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी दिली. गुगलने तर पुढील वर्षी म्हणजे जून २०२१ पर्यंत घरातून काम करण्याची परवानगी दिली आहे. जे कर्मचारी घरातून काम करणार आहेत अशांना गुगलने ७५ हजार रुपये (१ हजार डॉलर) देण्याचे जाहीर केले होते. ही रक्कम घरातून ऑफिसचे काम करताना लागणाऱ्या फर्निचर, इंटरनेट आदी गोष्टींसाठी असल्याचे गुगलने म्हटले होते.

आता गुगलनंतर आता आणखी एका कंपनीने कर्मचाऱ्यांना घरातून काम करताना आवश्यक वस्तू विकत घेण्यासाठी अधिकचे पैसे देण्याची घोषणा केली आहे. मोबाइल मेसेजिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणाऱ्या हाईकने त्यांच्या कर्मचाऱ्यांना या वर्षाच्या अखेरपर्यंत घरातून काम करण्याची परवानगी दिली असून प्रत्येक कर्मचाऱ्याला ४० हजार रुपये दिले जाणार आहेत. कंपनीने दिल्लीतील ऑफिसमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरामदायक खुर्ची आणि टेबल देणार असल्याचे म्हटले आहे. जे कर्मचारी ऑफिसमध्ये येणार नाहीत त्यांना खुर्ची आणि टेबल विकत घेण्यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपये दिले जातील. त्या शिवाय इंटरनेट आणि अन्य कामकाजाच्या वस्तू विकत घेण्यासाठी पैसे दिले जाणार आहेत.

२५ हजार रुपये फर्निचर आणि अन्य वस्तू, तसेच १ हजार ५०० प्रत्येक महिन्याच्या इंटरनेटसाठी दिले जाणार आहेत. कंपनीने हे स्पष्ट केले की, जे कर्मचारी ऑफिसला येत आहेत ते त्यांच्या इच्छेने येत आहेत. यासाठी सुरक्षित अंतर आणि स्वच्छतेचे अन्य मापदंडाचे पालन केले जात आहे.