‘या’ तारखेपासून लागू होणार नवीन नियम, आता फक्त ३ दिवसांत मोबाइल नंबर ‘पोर्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : आजकाल बरीच लोक काहीना काही कारणाने मोबाइल नंबर पोर्ट करतात. जर तुम्हीही मोबाईल नंबर पोर्ट करण्याचा विचार करत असाल तर ते खूप सोपे झाले असून ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच (TRAI)ने मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीचे नवे नियम जारी केले आहेत. त्या नवीन नियमांनुसार ग्राहकांना आता ३ दिवसांत आपला नंबर पोर्ट करता येणार आहे. हे नियम लवकरच म्हणजेच येत्या १६ डिसेंबरपासून लागू होणार आहेत त्यामुळे आता मोबाइल नंबर पोर्ट करणे सोपे होणार आहे.

मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी म्हणजे काय?

तुम्हाला जर एका मोबाइल कंपनीची सेवा आवडत नसेल किंवा न परवडणारी अशी असेल तर ती सेवा बदलून दुसऱ्या मोबाइल कंपनीची स्वस्तातील सेवा घ्यायची असेल तर मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीचा उपयोग होतो. यात फक्त कंपनी बदलते बाकी तुमचा मोबाइल नंबर तोच राहतो त्यामुळे तुम्हाला नवीन सिम कार्ड घेण्याची गरज पडत नाही. शिवाय आपला मोबाइल नंबर ही कायमस्वरूपी तोच राहतो. सध्या नंबर पोर्ट करण्यासाठी ७ दिवसांचा अवधी लागत होता. त्यामुळे मोबाइल धारकांना याची अडचण येत होती. आता हाच अवधी कमी होऊन ३ दिवसांचा असणार आहे. मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीमध्ये यूजरला पोर्टिंग कोड जनरेट करावा लागत असतो. या यूनिक कोडमुळे नंबर पोर्ट करता येऊ शकतो.

ऑपरेटर्सना देखील मिळणार फायदा

टेलिकॉम ऑपरेटर्सना मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी ट्रॅन्जॅक्शन साठी पैसे भरावे लागत असतात. ट्रायने ठरवलेली नवी फी आता ५.७४ रुपये झाली आहे. सध्या प्रत्येक ग्राहकासाठी टेलिकॉम ऑपरेटरला १९ रुपये द्यावे लागतात. एखाद्या कंपनीची सेवा जर आपल्याला आवडत नसेल तर ग्राहकाकडे दुसऱ्या कंपनीचा पर्याय हा उपलब्ध असणार आहे. आणि मोबाइल नंबर पोर्ट होणार आहे त्यामुळे हे करणं शक्य होणार आहे. एकंदरीत ऑपरेटर्सना देखील याचा फायदा होणार आहे.

Visit : Policenama.com