आता तुमचा मोबाईल नंबर 11 अंकी होणार, जाणून घ्या कधीपासून होणार नियम लागू

पोलिसनामा ऑनलाईन – कोणत्याही लँडलाइन फोनवरुन मोबाइल नंबरवर (Mobile number ) फोन करण्याची पद्धत आजपासून देशभरात पूर्णपणे बदलली आहे. आता लँडलाइन फोनवरुन मोबाइल नंबरवर (Mobile number ) बोलण्यासाठी नव्या नियमांनुसार शून्य (०) लावावा लागणार आहे. यामुळे टेलिकॉम कंपन्यांना अधिक नंबर बनवण्याची सुविधा मिळेल. याबाबत टेलिकॉम विभागाने २० नोव्हेंबर रोजी एक निवेदन जारी केले होते. लँडलाइनवरुन मोबाइल नंबर (Mobile number ) डायल करण्याच्या पद्धतीत ट्रायने (TRAI) सुचवलेल्या शिफारशी मान्य करण्यात आल्या असल्याचे या निवेदनात म्हटले होते. ही सुविधा आता आपल्या क्षेत्रातून बाहेर कॉल करण्यासाठी उपलब्ध आहे.

डायल करण्याच्या पद्धतीतील बदलामुळे दूरसंचार कंपन्यांच्या मोबाइल सेवांसाठी २५४.४ कोटी अतिरिक्त नंबर तयार करण्याची सुविधा मिळेल. हे भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करतील. त्याच्या पुढे जाऊन नवीन नंबरही कंपन्या जारी करु शकतील. एअरटेलने आपल्या फिक्स्ड लाइन ग्राहकांना सांगितले की, १५ जानेवारी २०२१ पासून अंमलात येत असलेल्या दूरसंचार विभागाच्या एक निर्देशानुसार तुम्हाला तुमच्या लँडलाइनवरुन कोणत्याही मोबाइलवर फोन लावताना आधी शून्य डायल करावा लागेल. दरम्यान, सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलचे अध्यक्ष पीके पुरवर यांनी याबाबत ग्राहकांना याची माहिती दिली जात असल्याचे सांगितले. भविष्यात टेलिकॉम कंपन्या ११ अंकी मोबाइल नंबर जारी करु शकतात. सध्या देशात मोबाइल ग्राहकांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे १० अंकांचा मोबाइल नंबरही कमी पडत आहे. अशावेळी केवळ ० च्या प्रयोगामुळे पुढील मार्ग सोपा होईल अशी आठवण करुन दिली. ग्राहकांना आजपासून (दि.१५) लँडलाइनवरुन मोबाइलवर कॉल करताना आधी शून्य डायल करावा लागेल.