धक्कादायक ! i Phone 4: साठी तरुणाने विकली किडनी     

बीजींग : वृत्तसंस्था – मोबाईलचे व्यसन आजकालच्या पिढीमध्ये इतके वाढले आहे की जणू हा मोबाईलच  त्यांचे आयुष्य होऊन बसले आहे. या  मोबाईलच्या अतिवापरमुळे त्याच्या दुष्परिणामांना ही त्यांना सामोरे जावे लागते. या मोबाईलचा वापर तरुण पिढीच करताना दिसत नाही तर लहान मुलांच्या हातात सुद्धा हा मोबाईल दिसून येतो. मोबाईलची आवड ही चीनमधील एका तरुणाला आयुष्याचा धडा शिकवणारी ठरली आहे. या तरुणाने आयफोनसाठी चक्क स्वतःची किडनी विकल्याची घटना उघडकीस आली आहे. या तरुणानं किडनी विकून आयफोन खरेदी केला खरा. परंतु आता या तरुणाला त्याची चूक समजली असून तो गेल्या सात वर्षांपासून अंथरुणाला खिळून पडल्याने मरण यातना भोगत आहे.
फोनसाठी विकली किडनी 
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या जिओ वँग नावाच्या एका तरुणानं सात वर्षापूर्वी ‘आयफोन-४’ खरेदी करण्यासाठी स्वतःची किडनी विकली होती. ‘आयफोन-४’ ज्यावेळी लाँच झाला त्यावेळी जिओ वँग अवघ्या १७ वर्षाचा होता व तो विद्यार्थी होता.  त्यावेळी शाळेत आयफोन म्हणजे प्रतिष्ठा समजली जात होती. आयफोन विकत घेवून मित्रांमध्ये शायनिंग मारण्यासाठी त्यानं किडनी विकण्याचा निर्णय घेतला. वँगने एक किडनी ३,२०० अमेरिकन डॉलरला म्हणजेच २,२३,२६५ रुपयांना विकली. त्यातून त्यानं ‘आयफोन-४’ खरेदी केला. वँग आता २४ वर्षाचा आहे.
एक किडनी काढल्यानंतर त्याचे काहीही दुष्परिणाम होणार नाहीत. उलट आठवडाभरानंतर तो पूर्वीसारखाच तंदुरुस्त होईल, असे वँगला सांगण्यात आले होते. परंतु, दुर्दैवाने त्याला किडनीची शस्त्रक्रिया करताना संसर्ग झाला. त्यामुळे गेल्या ७ वर्षापासून तो अंथरुनाला खिळून पडला आहे. त्याच्यावर उपचार करण्यासाठी आता त्याच्या कुटुंबाकडे पैसेही नाहीत. कुटुंबानं बराच खर्च केल्यानं तेही कर्जबाजारी झाले आहेत. विशेष म्हणजे, यासंदर्भात वँगने कुटुंबाला काहीही माहिती दिली नव्हती.