मोबाईल स्नॅचिंग करणारे जेरबंद ; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाइन – रस्त्याने मोबाईलवर बोलत जाणाऱ्या नागरिकांचे महागडे मोबाईल हिसकावून नेणाऱ्या दोघांच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट १च्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून ३५ मोबाईल आणि ३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट ३ पथकाने गोडाऊन चौकात करण्यात आली. करण विजय लाळगे (वय-१९ रा. दत्तमंदिराजवळ, भोसरी), रणजित रामशंकर गुप्ता (वय-१९ रा. धावडेवस्ती, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

भोसरी एमआयडीसी परिसरातील नागरिकांचे मोबाईल हिसकावून नेणारे दोघेजण गोडाऊन चौकात मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस शिपाई गणेश सावंत यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांनी मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. तसेच मोबाईल चोरीसाठी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. आरोपी रणजित गुप्ता याच्या घरातून २३ मोबाईल जप्त करण्यात आले. पोलिसांनी या कारवाईत ४ लाख ३० हजार रुपये किंमतीचे ३५ मोबाईल आणि ३ दुचाकी जप्त केल्या आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधिर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त रामराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उप निरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी रविंद्र राठोड, शिवाजी कानडे, बाळु कोकाटे, प्रविण पाटील, गणेश सावंत, विजय मोरे, विशाल भोईर, सचिन मोरे, मनोजकुमार कमले यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त