आपटे रोडवर ‘मोबाईल स्नॅचिंग’चे सत्र सुरूच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात मोबाईल हिसकावणार्‍या अन लुटमार करणार्‍या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, आपटे रोडला पुन्हा पादचारी तरुणाचा मोबाईल चोरट्यांनी हिसकावून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीसांकडून होणारे प्रयत्न मात्र अपुरे पडत असल्याचे दिसत आहे.

याप्रकरणी तुषार भुतेकर (वय 23, रा. शिवाजीनगर) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण राहण्यास शिवाजीनगर भागात आहेत.

दरम्यान, शुक्रवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास ते फोनवर बोलत आपटे रोडने जात होता.त्यावेळी पाठिमागून आलेल्या दुचाकीवरील चोरट्यांनी फिर्यादीच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. त्याने आरडा-ओरडा केला. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले.


पीएमपीएल बसमधून उतरताना हातातील बांगडी चोरली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सेनापती बापट रस्त्यावर पीएमपीएल बसमधून खाली उतरत असताना ज्येष्ठ महिलेच्या हातातील 55 हजार रुपयांची बांगडी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, शहरात मोबाईल लुटारूंसोबतच पीएमटी बसमधील चोर्‍या काही केल्या थांबत नसल्याचे दिसत आहे.

याप्रकरणी अंबुबाई धुमाळे (वय 78, रा. एन. डी. ए. खडकवासला) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या सुनेला भेटण्यासाठी एनडीएकडून जनवाडी येथे पीएमपीएल बसने जात होत्या. बस सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना हाॅस्पीटलजवळ आल्यानंतर त्या स्टॉपला उतरत असताना त्यांना आधार देण्यासाठी म्हणून एकाने त्यांना हाताला धरून खाली उतरवले. त्याचवेळी गर्दीचा फायदा घेऊन एकाने त्यांच्या हातातील 55 हजार रुपयांची सोन्याची बांगडी काढून घेतली. अधिक तपास चतु:श्रृंगी पोलीस करत आहेत.


चतु:श्रृंगीत बंद फ्लॅट फोडले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, चतु:श्रृंगीत चोरट्यांनी तीन बंद फ्लॅट फोडून लाखो रुपयांवर डल्ला मारला आहे. काही केल्या घरफोड्यांचे सत्र थांबत नसून, पोलीसांच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत. याप्रकरणी लतीका प्रधान (वय 65, रा. औंध) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी औंध परिसरातील कल्पनामती हाऊसिंग सोसायटीत राहण्यास आहेत. कामानिमित्त ते घराला कुलूप लावून गेले होते. त्यादरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच, घरातील बेडरूम व हॉलमधील सोन्याचे दागिने व वस्तू असा एकूण दिड लाखांचा ऐवज चोरून नेला. तर, त्यांच्या शेजारील रवीकिरण शहा आणि जयंत गोळे यांचेही बंद फ्लॅट फोडण्यात आले आहेत. परंतु, तेथून नेमका किती माल गेला हे समजू शकलेले नाही. हा प्रकार शनिवारी उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलीसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास चतु:श्रृंगी पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/