मोबाईल टॉवर्सचा ६०० कोटींचा मिळकतकर थकला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मोबाईल टॉवर कंपन्यांनी टॉवरचा मिळकत कर आणि त्यावरील दंड भरण्यासंदर्भात न्यायालयात धाव घेतल्याने  सुमारे ६०० कोटी रुपयांची थकबाकी गोळा करण्यात अडचणी येत आहेत. दोनच दिवसांपुर्वी नगरविकास विभागाच्या सचिवांनी मोबाईल कंपन्यांना मिळकत कर आणि दंड भरावाच लागेल, असे आदेश दिले आहेत. तर महापालिकेने ज्या ठिकाणी टॉवर उभारले आहेत, त्या खाजगी जागामालकांना पत्र पाठविण्यास  सुरूवात केली असून मोबाईल टॉवरच्या मिळकतकराची थकबाकी न भरल्यास ती जबाबदारी जागा मालकाची राहील. ही थकबाकी न भरल्यास महाराष्ट्र महापालिका अधिनियमाद्वारे कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या पत्राद्वारे देण्यात आला आहे.

पुणे शहरामध्ये २३०० हून अधिक मोबाईल टॉवर्स उभारण्यात आले आहेत. प्रामुख्याने हे सर्व टॉवर्स खाजगी इमारती आणि जागांवर आहेत. सुरवातीच्या काळात अनधिकृतपणेच अनेक टॉवर्स उभारण्यात आले होते. हे टॉवर्स बेकायदा असून त्यांची कर आकारणी करावी अशी मागणी नगरसेवकांकडून सातत्याने झाल्यानंतर महापालिकेने टॉवर कंपन्यांना नोटीस बजवायला सुरूवात केली. बेकायदा टॉवर्ससाठी तीन पट कर आकारणी करण्यात आली. याला मोबाईल टॉवर कंपन्यांनी विरोध दर्शवित न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, मागील वर्षानुवर्षे टॉवर कंपन्यांनी कर न भरल्याने त्यावरील दंडाचा आकडाही वाढत जावून आजमितीला या कंपन्यांकडे सुमारे ६०० कोटी रुपये थकबाकी झाली आहे.

महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेल्या मिळकतकराच्या थकबाकीचा आकडा वाढत असल्याने पालिकेच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम होत आहे. हीच परिस्थिती राज्यातील बहुतांश स्थानीक स्वराज्य संस्थांमध्ये निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर मागील आठवड्यात नगरविकास विभागाच्या सचिवांनी मोबाईल टॉवर कंपन्यांच्या प्रतिनिधींची मुंबईत बैठक घेउन त्याचवेळी स्थानीक स्वराज्य संस्थांतील अधिकार्‍यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला होता. त्यावेळी मोबाईल टॉवर कंपन्यांना स्थानीक स्वराज्य संस्थांची मिळकतकराची थकित देणी भरावीच लागतील, असे आदेश दिले आहेत.

दरम्यान पुणे महापालिकेने मोबाईल टॉवरच्या मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी आता हे टॉवर्स ज्या जागांवर उभारले आहेत, त्या जागा मालकांना पत्र पाठविण्यास सुरूवात केली आहे. त्यामध्ये मोबाईल टॉवरच्या मिळकतकर थकबाकी पोटी असलेली रक्कम नमूद केली आहे. हे पत्र मिळाल्यापासून ही थकबाकी एका ठराविक दिवसात भरावी. ही थकबाकी न भरल्यास ती भरण्याची अंतिम जबाबदारी जागा मालकाची राहील. त्यानुसार जागा मालकांनी योग्य ती कार्यवाही करावी. थकबाकी न भरल्यास महापालिका अधिनियमानुसार थकबाकी भरण्याची अंतिम जबाबदारी जागा मालकाची राहील, याची नोंद घ्यावी असा इशारा या पत्रात देण्यात आला आहे.

मोबाईल टॉवर ज्या जागांवर उभारले आहेत, त्या जागा मालकांना मोबाईल टॉवरची थकबाकी भरण्यासंदर्भात पत्र पाठविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. शहरात २३०० मोबाईल टॉवर्स असून हे टॉवर्स ज्या जागांवर उभारले आहेत, त्या जागा मालकांना कर आकारणी निरीक्षकांकडून ही पत्र देण्यात येत आहेत. – विलास कानडे, सह महापालिका आयुक्त, कर आकारणी व कर संकलन प्रमुख, पुणे महापालिका.