मुलींना स्वरक्षणार्थ शस्त्र परवाना मिळावा, मोची चर्मकार समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी कायद्यात कठोर तरतुद करण्यात यावी. मुलींना स्वरक्षणार्थ शस्त्र परवाना देण्यात यावा या मागणीसाठी मोची चर्मकार समाज, गुरु रविदास विचार मंच यांच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सर्व वयोगटातील मुली एकत्र जमल्या होत्या. यावेळी पुतळ्यास पुष्पहार अपर्ण करुन अभिवादन करण्यात आले. विविध घोष वाक्य लिहिलेले फलक हातात घेत जेल रोड मार्गाने कमलाबाई शाळेसमोरुन मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. शासनाने मुलीच्या जन्माचे स्वागत करत मुलगी जन्माला आली त्या दिवशीच तिच्या नावाने शस्त्र परवाना द्यावा. मुलगी लहान असताना तिचे संरक्षण आई, वडिल करु शकतात. मुलगी मोठी झाल्यावर तीचे स्वतःचे संरक्षण शस्त्राच्या आधारे करु शकते. त्यामुळे मुलीला शस्त्र परवाना मिळावा.

महिलांवरील अत्याचारातील आरोपींचा खटला जलद न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी. या लेखी मागणीचे निवेदन निवासी उप जिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना देण्यात आले.

यावेळी मानसी धिवरे, रेणुका खैरनार, पुष्पा साखरे, योगेश्वरी चत्रे, गीता डोंगरे, कविता लेवारीकर, उर्वशी चत्रे, प्रेरणा चत्रे, जागृती जपसरे, दिक्षा जुगलकर, कन्हैया साखरे यांसह अनेकजण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.