मोदींचा पुन्हा अल्पसंख्याकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न : चंद्राबाबू नायडू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगले नागरिक नाहीत. मी माझ्या अल्पसंख्याक बंधू, भगिनींना सांगू इच्छितो की, जर तुम्ही नरेंद्र मोदींना मत दिले तर नव्या समस्या निर्माण होतील. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अल्पसंख्याकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली.

यावेळी चंद्राबाबू नायडू म्हणाले, मी पहिला असा मुख्यमंत्री होतो की ज्यानी गुजरात दंगलीला कारणीभूत असलेल्या नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यानंतर अनेक देशांनी त्यांच्यावर बंदी घातली. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पुन्हा एकदा अल्पसंख्याकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे.

नायडू म्हणाले की, ‘मोदी दिलेली आश्‍वासने पूर्ण तर करतच नाहीत पण नोटाबंदी, जीएसटीसारखे प्रश्‍न निर्माण करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगले नागरिक नाहीत. मी माझ्या अल्पसंख्याक बंधू, भगिनींना सांगू इच्छितो की, जर तुम्ही नरेंद्र मोदींना मत दिले तर नव्या समस्या निर्माण होतील.’

मोदी यांनी चंद्राबाबू नायडू यांची तुलना बाहुबली चित्रपटातील भल्लाळदेवशी केली होती. याआधी १ एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांनी नायडू यांच्यावर टीका करत ‘यू-टर्न बाबू’ असल्याचा टोला लगावला होता. टीडीपी लोकांचा डेटा चोरत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मला सांगण्यात आले आहे की, टीडीपीने सायबर क्राइमशी संबंधित सेवा मित्र ऍप सुरू केले आहे. हे ऍप ना सेवा करत आहे, ना मित्र आहे. हे ऍप लोकांचा डेटा चोरत आहे, असा घाणाघातही केला होता.