‘मोदी बाबा आणि त्यांचे 40 चोर देशाला लुटत आहेत’ : काँग्रेसची मोदींवर घणाघाती टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राहुल गांधींनी केलेल्या टीकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मै भी चौकीदार ही मोहीम सोशल मीडियावर सुरु केली आहे. पंतप्रधान मोदींनी रविवारी ट्विटरवर स्वत:च्या नावात बदल केला. त्यांनी नरेंद्र मोदी या नावापुढे चौकीदार शब्द लावला. यानंतर अनेक नेत्यांनीही आपल्या नावात बदल केला आहे. दरम्यान काँग्रेसने मोदींच्या या कॅम्पेनवर निशाणा साधला आहे. मोदी बाबा आणि त्यांच्या 40 चोरांनी नावापुढे चौकीदार शब्दाचा वापर करुन देशाला लुटण्याचं काम करत आहेत अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केली आहे.

सुरजेवाला यांनी पत्रकार घेत मोदींवर आणि मोदींच्या कॅम्पेनवर टीका केली आहे. सध्या देशभरात चौकीदाराची चोरी चर्चेचा विषय बनली आहे असेही सुरजेवाला यांनी यावेळी म्हटले आहे.

‘त्यामुळे त्यांनी मै भी चौकीदार हा नारा समोर आणला’

पत्रकार परिषदेत बोलताना सुरजेवाला म्हणाले की, “मोदींचा ब्रँड अयशस्वी ठरल्यानंतर आता मै भी चौकीदार असा नवं कॅम्पेन भाजपकडून सुरु करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी यांचे अपयश लपविण्यासाठी अशा पद्धतीचा सोशल मिडीयाचा वापर केला जात आहे. प्रत्येक वर्षाला मोदी स्वत:च्या घोषणा बदलून नवीन घोषणा आणत असतं. मात्र मोदींची फसवी आश्वासने आता लोकांना कळू लागली आहेत. निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने मोदी घाबरले आहेत. त्यामुळे त्यांनी मै भी चौकीदार हा नारा समोर आणला आहे. गरिबांकडून पैसे काढायचे आणि श्रीमंतांना द्यायचे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ढोंगीपणा लोकांसमोर आलेला आहे.”

‘मोदी बाबा आणि त्यांचे 40 चोर टोळी बनवून देशाला लुटत आहेत’
पुढे बोलताना सुरजेवाला म्हणाले की, “पुरातन काळात दरोडा, अपहरण करणाऱ्या टोळ्या वेश बदलून लोकांना लुटत होते. मात्र सध्याच्या काळात मोदी बाबा आणि त्यांचे 40 चोर टोळी बनवून देशाला लुटत आहेत. 5 वर्षात चौकीदाराने शेतकऱ्यांचे पैसे लुटले, महिलांच्या सुरक्षेचे अधिकार लुटले, युवकांपासून त्यांच्या नोकऱ्या लुटल्या. वंचित घटकांचा अधिकार लुटला आणि छोट्या व्यापारांचा व्यवहार लुटला” अशी टीका काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.