आंध्रप्रदेशच्या सभेत मोदींचा चंद्राबाबू नायडूवर घणाघात

अमरावती : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या राज्यात सभा घेत आहेत. सध्या मोदी आंध्रप्रदेश दौऱ्यावर आहेत. गुंटूर येथील जाहीर सभेत मोदींनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर जोरदार टीका केली. चंद्राबाबूंनी स्वतःच्या सासऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे असा गंभीर आरोप मोदींनी यावेळी केला.

2014 ला आमचं सरकार आलं, तेव्हा आम्ही आंध्र प्रदेशसाठी विशेष पॅकेज दिलं. 2016 मध्ये ते पॅकेज लागूही करण्यात आलं. त्यामुळे आंध्र प्रदेशला विशेष राज्यासारखीच मदत मिळाली. आंध्राच्या मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट स्वीकारून केंद्राचे आभार मानले होते. परंतु केंद्रानं दिलेल्या पॅकेजचा आंध्र सरकारनं योग्य वापर केला नाही. असा घणाघात मोदींनी यावेळी केला.

दिल्लीतल्या नावाजलेल्या कुटुंबीयांनी अहंकारात नेहमीच आंध्र प्रदेशातील नेत्यांचा अपमान केला आहे. त्यामुळेच एनटी रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली. टीडीपी नेत्यांनी काँग्रेसमुक्त भारतासाठी काम केलं पाहिजे, तेच आता काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचं काम करत आहेत. राज्याचा विकास करण्यात अपयशी ठरलेल्या टीडीपीनं नंतर यू-टर्न घेतला, आमचा उद्देश स्वतःसाठी नव्हे, तर देशासाठी धन निर्माण करण्याचा आहे, असं मोदींनी यावेळी म्हटलं.

तुमच्या चौकीदारानं यांची झोप उडवली आहे. एक एक पैशाचा हिशेब द्यावा लागल्यावर मुख्यमंत्र्यांची झोप उडाली. आंध्राच्या लोकांनी आता तरी जागे व्हा, असं आवाहन केले. उद्या ते दिल्लीत फोटो काढण्यासाठी जात आहे. परंतु भाजपा आपल्या कार्यकर्त्यांच्या पैशानं कार्यक्रम करते, तर हे आंध्रच्या जनतेच्या तिजोरीतून पैसे काढून कार्यक्रम करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.