Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळं मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, 22 मार्चपासून देशात लॅन्ड होणार नाही एकही प्रवासी परदेशी विमान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे गुरुवारी देशात मृत्यूची संख्या 4 झाली आहे. तसेच संसर्ग झालेल्यांची संख्या वाढून 177 झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. त्यांच्या संबोधनापूर्वीच सरकारने कोरोना विषाणूसंदर्भात मोठे निर्णय जाहीर केले आहेत. सरकारच्या निर्णयानुसार, 22 मार्चपासून परदेशातून भारतात येत असलेल्या सर्व प्रवासी विमानांच्या लँडिंगला आठवडाभरासाठी बंदी घालण्यात आली आहे.

मोदी सरकारच्या वतीने, सर्व राज्य सरकारांना सांगण्यात आले आहे की सरकारी कर्मचारी, वैद्यकीय व्यावसायिक आणि लोकप्रतिनिधी यांच्याशिवाय 65 वर्षांवरील वयोवृद्ध व्यक्तींनी घरी राहण्यासाठी सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत.

याशिवाय दहा वर्षाखालील मुलांना घरी राहण्यास सरकारने सांगितले आहे. त्यांना घर सोडण्यास मनाई आहे. तसेच रेल्वे, विमान वाहतूक कंपन्यांना विद्यार्थी, रूग्ण आणि अपंग वगळता सर्व नागरिकांना तिकिटांवरील सूट बंद करण्यास सांगितले आहे.

खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांना घरूनच कामाची सुविधा मिळावी, अशी विनंती केंद्र सरकारने राज्यांना केली आहे. आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात यावी. गर्दी जमण्यापासून रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्रुप बी आणि ग्रुप सी प्रवर्गातील कर्मचार्‍यांना पर्यायी आठवड्यात कार्यालयात येण्यास सांगितले आहे.

कोरोना विषाणूच्या गंभीर परिस्थितीमुळे आणि त्यास सामोरे जाण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या वाढून 177 झाली आहे. तसेच यातून आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे.