केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता कांद्याच्या बियाणे निर्यातीवरही घातली बंदी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. यानंतर शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त झाली होती. आता केंद्र सरकारने आणखी एक निर्णय घेत कांद्याच्या बियाणे निर्यातीवरही बंदी घातली आहे. पावसात मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाल्याने बियाणाचेही नुकसान झाले असून देशात कांदा बियाणाची तीव्र टंचाई आहे. या कारणामुळे हा निर्णय घेऊन अंमलबजावणी सुरू केल्याचे केंद्राने म्हटले आहे.

सध्या कांद्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. केंद्राने निर्यात बंदी घालूनही कांदा दरावर कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नाही. इतकेच नव्हे, तर सरकारने परदेशातून कांदा आयात करण्यचा निर्णय घेऊनही कांद्याचे दर शंभरीच्या जवळपास पोहचले आहेत. सरकारच्या या प्रयत्नांना यश का येत नाही, असा प्रश्न पडलेला असतानाच आता कांद्यांच्या बियाण्यांची टंचाई निर्माण झाल्याने बियाणाच्या निर्यातीवर सुद्धा केंद्राने बंदी घातली आहे. 1 हजार रुपये किलो दराने मिळाणारे बियाणे आता 4 हजार रूपयांवर पोहचले आहे. कांदा लागवडीसाठी बियाणाची तीव्र टंचाई निर्माण होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. निर्यातबंदी केल्याने बियाण्यांच्या भावावर नियंत्रण येईल, असे केंद्राला वाटत आहे.

दररोज 4000 टन कांदा भारतात येणार
कांद्याचे भाव अव्वाच्या सव्वा वाढल्याने सर्वसामान्य हैराण झाले आहेत. यामुळे सरकारने एक लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानमधून दररोज 4000 टन कांदा भारतात येईल, अशी माहिती सीएनबीसी आवाजने दिली आहे. सध्या सरकारकडे अवघा 25 हजार टन कांदा बफर स्टॉकमध्ये आहे. यामुळेच आयातीचा निर्णय घेतला आहे. बफर स्टॉक नोव्हेंबरआधीच संपण्याची शक्यता आहे.

राज्यांना दिला जाईल 21 रुपये किलोने कांदा
नाफेडचे डायरेक्टर अशोक ठाकूर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, लवकरच 21 रुपये प्रति किलो दराने राज्यांना कांदा पाठवला जाईल. यानंतर नाफेडकडून हा 21 रुपये प्रति किलोचा कांदा मिळाल्यानंतर राज्य सरकार सर्व खर्च पकडून 30 रुपये प्रति किलोने कांदा विकू शकतात. किंमती नियंत्रित करण्यासाठी नाफेड सुरक्षित भांडारातून कांदा बाजारात आणत आहे. नाफेडने यावर्षी जवळपास एक लाख टन कांद्याची खरेदी केली होती.

You might also like