‘आत्मरनिर्भर’ भारत ! 101 संरक्षण उपकरणांच्या आयातीवर 2024 सालापर्यंत बंदी

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी देशांतर्गत संरक्षण सामग्री निर्मिती उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले. हेलिकॉप्टर्स, वाहतूक विमाने, पाणबुड्या तसेच क्षेपणास्त्रांच्यासह १०१ संरक्षण उत्पादनांच्या आयातीवर २०२४ सालापर्यंत बंदी घालण्याची घोषणा त्यांनी केली.

राजनाथसिंह यांनी ट्विट करत ही माहिती दिली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘आत्मरनिर्भर’ भारत बनविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्या प्रयत्नांना बळकटी देण्यास संरक्षण खाते सुद्धा सज्ज झाले आहे. त्यासाठी देशातील उद्योगांना पुढील ५ ते ७ वर्षात सुमारे चार लाख कोटी रुपयांची कामे दिली जातील. २०२५ पर्यंत विविध प्रकारची संरक्षण उत्पादने खरेदी करण्याकरिता १.७५ लाख कोटी रुपये खर्च होणार होते, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले. जागतिक संरक्षण कंपन्यांना शस्त्रे विकण्यासाठी भारत मोठी बाजारपेठ आहे. गेली आठ वर्षे भारत जगातील तीन मोठ्या संरक्षण आयातदार देशांपैकी एक आहे.

राजनाथसिंह यांनी पुढं म्हटलं की, डिसेंबर २०२१ पर्यंत चिलखती हवाई वाहने आयात केली जाणार होती. मात्र, आता ती देशातच तयार होती. नौदलासाठी पाणबुड्यांची गरज असून, सहा पाणबुड्यांची किंमत ४२ हजार कोटी रुपये आहे. त्या आता भारतात तयार होतील अशी अपेक्षा आहे. हवाई दलासाठी ‘एलसीए एमके १ ए’ विमाने डिसेंबर २०२० पर्यंत घेणे अपेक्षित होते. पण या १२३ विमानांची किंमत ८५ हजार कोटी रुपये असून, ती देशातच तयार होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कल्पकतेला मिळेल वाव

देशात उत्पादने बनविणाऱ्या कंपन्यांना आता सुवर्णसंधी चालून आली आहे. म्हणून या कंपन्या स्वतःची कल्पकता वापरुन किंवा डीआरडीओने बनविलेल्या आराखड्यानुसार आता या सामग्रीचे उत्पादन करु शकतील, अशी अशा राजनाथसिंह यांनी व्यक्त केली.

आयातील निर्बंध लावण्यात आलेली सामग्री

लघू पल्ल्याची क्षेपणास्त्रे, क्रूझ क्षेपणास्त्रे, गस्ती नौका, इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्र यंत्रणा, क्षेपणास्त्रसज्ज युद्धनौका, तोफा आणि तोफगोळे, पाणबुडी विरोधी अग्निबाण प्रक्षेपक, लघू पल्ल्याची सागरी टेहळणी विमाने, मूलभूत प्रशिक्षण विमाने, हलके अग्निबाण प्रक्षेपक, बहुउद्देशीय अग्निबाण प्रक्षेपक, क्षेपणास्त्र विनाशिका, जहाजांवरील ‘सोनार’ यंत्रे अग्निबाण, अस्त्र एमके, हलक्या यांत्रिक बंदुका, जहाजावर वापरण्यात येणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या तोफा, १५५ मि. मी तोफा.