राम मंदिराच्या मुद्यावरून भाजपाच्या ‘या’ नेत्याने दिला घरचा ‘आहेर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राम मंदिर उभारण्याच्या मुद्यावरून भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. राम मंदिर बांधण्यास मोदी सरकारच उशीर करत असल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या खासदारांना घेऊन उद्धव ठाकरे आयोधेत गेले होते. आयोध्येतून परतल्यानंतर स्वामी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी राम मंदिर उभारण्याच्या मुद्यावर चर्चा दोघांमध्ये झाली. या भेटीनंतर सुब्रमण्याम स्वामी यांनी ही राजकीय भेट नसून सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर सुब्रमण्याम स्वामी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राम मंदिर उभारणीसाठी ज्या लोकांच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत. त्याची कागदपत्रे कोर्टामध्ये सादर केल्यानंतर मंदिर उभारणीची सुरुवात होईल. राम मदिराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चुकीचा सल्ला दिला असून यावर आपण मोदींशी पत्रव्यवहार केला आहे. याच मुद्यावर आज उद्धव ठाकरे आणि माझ्यात चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.