मोदी सरकारकडून मोठा दिलासा ! FASTag नाही तर 15 जानेवारी पर्यंत करू शकाल कॅश पेमेंट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फास्टॅग बाबत आता घाबरण्याचे कोणतेच कारण नाही, सरकारने आता एक महिन्यासाठी दिलासा दिलेला आहे. आजपासून नॅशनल हायवे वरून प्रवास करणाऱ्या चारचाकी वाहनांना टोलनाक्यावरून जाण्यासाठी फास्टॅग लावणे गरजेचे आहे. परंतु सरकारने प्रवाशांना होत असलेल्या समस्या लक्षात घेऊन टोलनाक्यावरील चवथ्या रांगेला ‘हायब्रीड लेन’ बनवण्याची घोषणा केली आहे. या लेनमधून जाण्यासाठी ग्राहक रोख रक्कम देऊ शकतात.

केवळ 30 दिवसांसाठी मंजुरी
परिवहन मंत्रालयाने हा अस्थायी उपाय असल्याचे स्पष्ट केले आहे त्यामुळे यासाठी केवळ 30 दिवसांसाठी परवानगी देण्यात आली आहे. प्रवाशांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. फास्टॅग लावण्यासाठीही अंतिम तारीख आता 15 डिसेंबर करण्यात आलेली आहे.

काय आहे फास्टॅग ?
हे एक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन आहे. फास्टॅगला गाडीच्या समोरील काचेवर लावले जाते, जेणेकरून टोलनाक्यावरील सेन्सर त्याला रीड करून अ‍ॅटोमॅटिक पद्धतीने पैसे कट होतात. यामुळे वाहनांची लांबच लांब रांग लागत नाही. एकदा सुरु झालेले फास्टॅग पाच वर्षांपर्यंत अ‍ॅक्टिव्ह राहते त्याला केवळ वेळेवर रिचार्ज करावे लागते.

कसे मिळेल फास्टॅग
आपल्या वाहनासाठी फास्टॅग खरेदी करणे खूप सोपे आहे. आपण नवीन कार खरेदी करतानाच डीलरकडून फास्टॅग मिळवू शकता. जुन्या वाहनांसाठी राष्ट्रीय महामार्गाच्या विक्रीच्या ठिकाणी खरेदी केले जाऊ शकते. याशिवाय तुम्ही खासगी क्षेत्रातील बँकांकडूनही फास्टॅग खरेदी करू शकता. यामध्ये सिंडिकेट बँक, अ‍ॅक्सिस बँक, आयडीएफसी बँक, एचडीएफसी बँक, एसबीआय बँक आणि आयसीआयसीआय बँक यांचा समावेश आहे. आपण इच्छुक असल्यास, आपण पेटीएम वरून फास्टॅग देखील खरेदी करू शकता.

कागदपत्रांची आवश्यकता
आपण पॉईंट ऑफ सेल (पीओएस) वरून फास्टॅग खरेदी करत असल्यास आपल्याला काही कागदपत्रे द्यावी लागतील. आपल्याला या कागदपत्रांची मूळ प्रतही सोबत आणावी लागेल जेणेकरून पडताळणी करता येईल. यात वाहन नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे आरसी, वाहन मालकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि केवायसी कागदपत्रांचा समावेश असावा. यात आपला ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र किंवा आधार कार्ड समाविष्ट असू शकते. आपले वाहन खाजगी आहे की व्यावसायिक आहे यावर कागदपत्रांची आवश्यकता देखील अवलंबून आहे.

अशा प्रकारे करू शकता वापर 
फास्टॅग वाहनाच्या समोरील काचेवर लावावे लागणार आहे. पहिल्यांदा वापरात असलेल्या युजर्सला आपल्या वॉलेटला लिंक करावे लागणार आहे. ज्यांच्याकडून फास्टॅग घेतले आहे त्यांच्याकडून याबाबतच्या वापराच्या स्टेप माहिती करून घेऊ शकता. या वॉलेटला ऑनलाइन रिचार्ज केले जाऊ शकते. वापरताना पैसे कट झाल्यावर एसएमएस देखील तुमच्या क्रमांकावर येतो.

काय होणार फायदा
फास्टॅग वापरल्यामुळे सर्वात मोठा फायदा हा आहे की, तुम्हाला टोल साठी लांब रांगेत थांबावे लागणार नाही. ऑनलाइन सेवा असल्यामुळे कॅश सोबत नसेल तरी चालू शकते. मोठ्या रांगा लागत नसल्याने हायवेचे प्रदूषण देखील कमी होते. फास्टॅगच्या वापरामुळे अनेक प्रकारचे कॅशबॅक आणि इतर ऑफर देखील मिळतात.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/