Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’ वाढणार का ? मोदी सरकारने दिलं ‘हे’ उत्तर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर केले आहे. 25 मार्चपासून सुरू झालेला लॉकडाऊन 21 दिवसांचा असून 14 एप्रिलपर्यंत असणार्‍या या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता बाकी पूर्णपणे बंद पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी हे लॉकडाऊन गरजेचे असल्याचे पंतप्रधान म्हटले आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात येण्याची शक्यता आहे, अशा काही बातम्या पुढे येत होत्या. याबाबत कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी लॉकडाऊन वाढवण्याची कोणतीही योजना नाही असे सांगितले आहे.

कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी लॉकडाऊनबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘ मी असे अहवाल वाचून हैराण झालो आहे. लॉकडाऊन वाढवण्याची कोणतीही योजना नाही’. भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा एक हजारापेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे भारतातील धोका वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी घरात राहणे आणि स्वत:चा बचाव करणे हा एकमेव पर्याय आहे.

मात्र, तरीही अनेक नागरिक घराबाहेर हिंडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लॉकडाउनचा कालावधी वाढणार असल्याचे पेव वाढले होते. त्यापार्श्वभूमीवर कॅबिनेट मिटींगमध्ये कोणताही लॉकडाउन वाढवणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.