मोदी सरकार परदेशातलं नाही, मदत मागण्यात गैर काय ?, CM उध्दव ठाकरेंचा फडणवीसांवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका शेती पिकाला बसला आहे. अतिवृष्टी झालेल्या परिसराचा पाहणी दौरा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, राज्यात अतिवृष्टी झाली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने केंद्राकडे मदत मागितली तर त्यात बिघडलं कुठे ? केंद्रातलं सरकार हे देशाचं सरकार आहे परदेशातील सरकार नाही असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

एवढंच नाही तर संकटाच्या परिस्थितीत सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे. राजकारणाचा चिखल करायला नको. शुक्रवारी पंतप्रधानांचा सुद्धा मला फोन आला होता. त्यांनी आवश्यक ती मदत करु असे सांगितले आहे. त्यामुळे केंद्राकडे मदत मागण्यात काहीच गैर नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

आजच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. कोणतंही संकट आलं की सगळी जबाबदारी केंद्रावर ढकलायची आणि आपण नामानिराळं व्हायचं हे ठाकरे सरकारचं धोरण योग्य नाही. मोदी सरकार मदत करणारच पण राज्यावर संकट आल्यानंतर पहिली जबाबदारी राज्य सरकारची आहे. ही जबाबदारी झटकून कसं काय चालेल ? असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला. फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे मदत मागितली तर गैर काय ? मोदी सरकार आपल्या देशाचं आहे. परदेशातले नाही असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

दरम्यान, सध्या पाऊस खूप विचित्र पडतो आहे. एका 72 वर्षाच्या शेतकऱ्याने सांगितले की, त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्याने असा पाऊस पाहिलेला नाही. आजच मला परिस्थिती कळली असं नाही. पावसाला सुरुवात झाल्यापासून यंत्रणेच्या संपर्कात आहे. नुकसान किती होतंय, पाऊस किती पडतोय याची माहिती सातत्याने घेत होतो. उद्या परवाही मी येणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.