मोदी सरकारनं IT कंपन्यांसाठी काढला नवीन आदेश, आता ‘वर्क फ्रॉम होम’चा कालावधी 31 डिसेंबरपर्यंत वाढवला

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरासह भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचे दिसत आहे. यातच भारतात बऱ्याच कर्मचाऱ्यांचं ‘वर्क फ्रॉम होम’ चालू आहे. अशातच केंद्र सरकारने काल (मंगळवार) ‘वर्क फ्रॉम होम’चा कालावधी 31 डिसेंबर 202प पर्यंत करण्याचे निर्देश दिले आहेत. हे आदेश मुख्यत्वे IT आणि BPO कंपनीला लागू असतील.

‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची मुभा 31 जुलैला समाप्त होत आहे. दूरसंचार विभागाने काल रात्री उशिरा ट्विट करत सांगितलं की, ‘वाढत्या कोरोनाचा पार्श्वभूमीवर दूरसंचार विभागाने वर्क फ्रॉम होमची तारीख 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवली आहे.’ याकाळात IT कंपनीतील सुमारे 85 टक्के कर्मचारी घरून काम करत आहेत. जे लोक महत्वाच्या पदावर किंवा ज्यांचं काम खूपच महत्वाचं आहे त्या लोकांना ऑफिसमध्ये जाऊन काम करण्यास परवानगी दिली आहे.

इकडे दुसऱ्या बाजूला कोरोनाचा जोर काही कमी होताना दिसत नाहीये. दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढतोच आहे. ताज्या माहितीनुसार, मंगळवारी रात्रीपर्यंत भारतात कोरोनाने आतापर्यंत 11 लाख 92 हजार 151 लोकांना विळखा घातला होता. मंगळवारी 37238 नवीन रुग्ण आढळले तर 670 जणांचा बळी गेला होता. आतापर्यंत 28769 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या भारतात 4 लाख 10 हजार 665 कोरोनाचे सक्रिय केस आहेत.

गेल्या सहा दिवसांपासून दररोज 35 हजारांहून जास्त कोरोनाचे रुग्ण समोर येत आहेत. आता यामुळे अजून किती दिवस घरून काम करावं लागेल हे आताच सांगता येणार नाही. कदाचित ते 31 डिसेंबर नंतरही वाढू शकतं.