मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ! अर्थमंत्र्यांनी दिले स्पष्ट संकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं देशाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. यामुळं अर्थव्यवस्था अडचणीत सापडली आहे जी अद्यापही रुळावर आलेली नाही. त्यामुळं आता केंद्र सरकार लवकरच तिसरं आर्थिक पॅकेज जाहीर करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.

याबाबत बोलताना सीतारामण म्हणाल्या, “कोरोनामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारकडे आणखी एका आर्थिक पॅकेजचा पर्याय आहे. सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) नेमक्या कोणत्या कारणामुळं घट झाली, याचं आकलन करण्यास सरकारनं सुरुवात केली आहे. यातून केंद्राला काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. त्याचा अभ्यास करून त्याचे निष्कर्ष आम्ही संसदेत किंवा लोकांसमोर मांडू” असंही त्यांनी सांगितलं.

सरकारी कंपन्यांना खर्च वाढवण्याच्या स्पष्ट सूचना

सार्वजनिक क्षेत्रातल्या मोठ्या सरकारी कंपन्यांना खर्च वाढवण्याच्या सूचना अर्थमंत्री सीतारामण यांनी दिल्य आहेत. सीताराण यांनी सांगितलं की, मोठ्या कंपन्यांना 2020-21 मध्ये योजनाबद्ध रितीनं भांडवली खर्चाच्या 75 टक्के हिस्स्याच्या 75 टक्के रक्कम डिसेंबर 2020 पर्यंत खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळं कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर झालेला नकारात्मक परिणाम दूर करण्यास मदत मिळेल.

सीतारामण यांनी कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू यांच्या संबंधित मंत्रालयांच्या 14 कंपन्यांच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांची ऑनलाईन बैठक घेतली. भांडवली योजनांवर वेगानं काम करण्याच्या सूचना सीतारामण यांनी बैठकीत दिल्या. यावेळी सरकारी कंपन्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. सरकारी कंपन्यांनी खर्च वाढवल्यास अर्थव्यवस्थेला गती मिळेल. त्यामुळं 2020-21 आणि 2021-22 मध्ये भांडवली खर्च वाढवण्याचं आवाहन अर्थमंत्र्यांनी केलं.