अब कि बार, अ‍ॅप द्वारे कामे दाखवणार ; मोदींचे निवडणूक अस्त्र 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारचा कार्यकाल संपण्यासाठी काही महिन्यांचा अवधी राहिला असताना मोदी सरकारच्या वतीने आता नवीन नीतीचा अवलंब केली जाण्याचा संभव आहे. मोदी सरकार आपल्या सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा जनते पुढे मांडण्यासाठी मोबाईल अ‍ॅप या आधुनिक प्रणालीचा उपयोग करणार आहे. या अ‍ॅपमध्ये मोदी आपल्या कामाचे इतिवृत्त देणार असून त्यात विकास कामांचे व्हिडीओ देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

स्मार्ट सिटी,गरिबांसाठी घर, अमृत योजना , स्वच्छ भारत, हृदय योजना , आयुष्यमान योजना इत्यादी योजना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रभावी साधन हे मोबाईल अ‍ॅप  होऊ शकते असा मोदी सरकारचा मानस आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर काही महिने हे अ‍ॅप पेश करण्याचे कारण दुसरे तिसरे काहीच नसून येत्या निवडणूक जिकंण्याचे आहे असे सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. या  अ‍ॅपवर अपलोड करण्यात येणाऱ्या डेटाचे काम अंतिम टप्प्यात असून प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहिती संकलनाचे काम करण्यासाठी  चांगलेच कामाला लावले आहे असे एका अतिकार्याने नाव उघड नकरण्याच्या सबबीवर सांगितले आहे.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हे अ‍ॅप पब्लिश केले जाण्याची शक्यता आहे. या अ‍ॅपमध्ये लोकांना योजनांची सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाणार असून आयुष्यमान योजनेचा लाभ कसा घ्यायचा या योजनेसाठी अर्ज कसे करायचे अशी सर्व माहिती या मध्ये संकलित केली जाणार आहे. आज पर्यंत किती लोकांना पंतप्रधान घरकुल योजनेत घरकुल मिळाले आणि आणखी किती घरकुले वाटली जाणार आहेत याविषयी माहिती या अ‍ॅपमध्ये साठवण्यात येणार आहे.

या अगोदर या संदर्भात मोदी सरकारने यावर काम केले होते. परंतु ग्रामीण विकास या एकाच खात्याचे अ‍ॅप निर्माण करण्यात आले होते. या अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण इलाख्यात जर पक्के रस्ते नसतील तर त्याचे फोटो या अ‍ॅपवर अपलोड केल्यास सरकार या रस्त्याचे काम करून देत असे हि योजना सरकारने अद्याप सुरु ठेवली आहे. याच धरतीवर हे नवे अ‍ॅप तयार करून मोदी सरकारच्या वतीने निवडणुकीच्या मैदानात भक्कम पावले टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या आशेने सुरु केलेली स्वच्छ भारत योजनेची नेमकी काय माहिती या अ‍ॅप अपलोड करायची या बाबत सर्वच अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे.