‘एअर स्ट्राईक’मध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘विंग कमांडर’ अभिनंदन यांना ‘वीर चक्र’ पुरस्कार मिळणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करणारे भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा भारत सरकारकडून वीर चक्र देऊन सन्मान करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देताना त्यांच्या एफ-१६ विमानाला पिटाळून लावताना अभिनंदन यांनी हवाईदलाच्या मिग-२१ विमानासह पाठलाग करून त्यांचे एफ- १६ विमान पाडले होते.

पाकिस्तानी विमानाचा पाठलाग करताना अभिनंदन यांचे विमान चुकून पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसले. त्यानंतर विमान कोसळल्यानंतर अभिनंदन हे चुकून आपल्या पॅराशूटने पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरले. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना पाकिस्तानी लष्कराच्या हवाली केले.

यावेळी पाकिस्तानी लष्कराने त्यांचा प्रचंड मानसिक छळ केल्याचे दिसून आले होते. त्याचबरोबर त्यांच्याकडून गोपनीय माहिती देखील मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अभिनंदन यांनी धाडस दाखवत पाकिस्तानच्या अत्याचारांना सहन करत तोंड उघडले नाही. अखेर पाकिस्तानने भारतापुढे झुकत त्यांना भारताच्या हवाली केले. त्यांच्या या शौर्याला सलाम म्हणून भारतीय सरकारकडून त्यांना हे वीरचक्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ज्या वैमानिकांनी हवाई हल्ल्यात दहशतवाद्यांची अड्डे उध्वस्त केले त्यांचा देखील सन्मान केला जाणार आहे.

दरम्यान, भारत सरकारकडून अजूनपर्यंत या प्रकारची कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसून यासंदर्भात लवकरच नवीन माहिती हाती येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त