‘कर्मचार्‍यांच्या सुट्ट्या वाढून होऊ शकतात 300, PF मध्ये होईल बदल’ – मोदी सरकार लवकरच घेणार निर्णय

नवी दिल्ली : नव्या कामगार कायद्याबाबत पुन्हा एकदा कामगार मंत्रालय, उद्योग जगतातील प्रतिनिधी आणि लेबर युनियनशी संबंधीत लोकांमध्ये चर्चा सुरू आहे. नव्या कामगार कायद्यांतर्गत कर्मचार्‍यांचे कामाचे तास, वार्षिक सुट्ट्या, पेन्शन, टेक होम सॅलरी, रिटायर्मेंट इत्यादीच्या नियमात बदल होणार आहेत. हे नवे नियम 1 एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता आहे. नव्या नियमांतर्गत कर्मचार्‍यांच्या पेड लिव्हची मर्यादा आणि संख्येवर सुद्धा महत्वाचा निर्णय होणे बाकी आहे.

सुट्टीची मर्यादा वाढवण्याची मागणी
हिंदूस्तानच्या वृत्तानुसार, लेबर युनियन्सकडून करण्यात आलेल्या पीएफ आणि पेड सुट्ट्यांची मर्यादा वाढवण्याच्या मागणीवर सुद्धा चर्चा होणार आहे. युनियनशी संबंधीत लोकांची इच्छा आहे की, पेड लिव्हची मर्यादा 240 वरून वाढवून 300 दिवस करण्यात यावी. सरकारला निवासी आणि अन्य बांधकाम मजूर, बीडी कामगार, पत्रकार आणि दृकश्राव्य कामगारांसह सिनेमा क्षेत्राशी संबंधीत कामगारांसाठी वेगळे नियम बनवण्याची मागणी करण्यात आली आहे.

ईपीएफचे बदलणार नियम
भारतीय मजदूर संघाने सरकारकडे मागणी केली आहे की, कर्मचारी राज्य विमा योजनेप्रमाणे कर्मचारी भविष्य निधी योजना म्हणजे ईपीएफ अंतर्गत पात्रता मापदंड 15,000 रुपये मासिक वेतनावरून वाढवून 21,000 रुपये करण्यात यावा.

1 एप्रिलपासून लागू होतील नवे कामगार कायदे
संसदेकडून कामगारांशी संबंधीत नवीन सुधारित कायदा सप्टेंबर 2020 मध्ये पास झाला होता. आता केंद्र सरकारचा प्रयत्न आहे की, हा कायदा या वर्षी एप्रिलपासून म्हणजे सध्याच्या आर्थिक वर्षात लागू करण्यात यावा. केंद्र सरकारकडून याबाबत व्हिडिओ कॉन्फ्ररन्सिंगद्वारे सर्व हितधारकांसोबत बैठक घेण्यात आली, मात्र या बैठकीवर अनेक कामगार संघटनांनी बहिष्कार टाकला होता. प्रकरणाशी संबंधीत अधिकार्‍यांनुसार, कायद्यावर अंतिम टप्प्यातील चर्चा सुरू आहे. सर्व मुद्द्यांवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि यानंतर लवकरच नवीन नियम नोटीफाय केले जातील.