खुशखबर ! वाहन खरेदी होणार ‘स्वस्त’, ‘नोंदणी शुल्क’ वाढीचा प्रस्ताव सरकारने तात्पुरता ‘गुंडाळला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वाहन निर्मिती क्षेत्रात मंदीने तणावाचे वातावरण असल्याने आणि अनेकांच्या नोकऱ्या जात असल्याने सरकारने यावर दिलासा म्हणून नोंदणी शुल्क वाढवण्याचा निर्णय रद्द केला आहे. सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोस्ताहन देण्यासाठी पेट्रोल, डिझेलच्या वाहनावरील नोंदणी शुल्क वाढवण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत होते. मात्र सध्या वाहन निर्मिती क्षेत्रातील परिस्थिती पाहून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

ग्राहकांना फायदा –
याचा फायदा वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना देखील होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना काही काळ वाहने स्वस्तात मिळणार आहेत. वाहन विक्रीत जवळपास 30 टक्क्याने कपात झाली आहे. मागील 18 वर्षांतील ही सर्वात मोठी कपात आहे.

मार्च 2020 पर्यंत वाढवणार नाही नोंदणी शुल्क –
पुढील 3 – 4 महिने तरी सरकार नोंदणी शुल्कात वाढ करणार नाही. सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोस्ताहन देण्यासाठी पेट्रोल, डिझेलच्या वाहनावरील नोंदणी शुल्क 10 – 20 पट वाढण्याच्या तयारीत होते.
यामुळे पेट्रोल, डिझेलच्या वाहनांचे नोंदणी शुल्क वाढवून 600 रुपयांवरुन 5000 रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तर नोंदणी नुतणीकरण शुल्कात वाढ करुन 15000 रुपयांचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

वाहन निर्मिती क्षेत्रातून या प्रस्तावाला विरोध करण्यात येत होता. चारचाकीच्या विक्रीत कपात झाली आहे. यामुळे उत्पादनात कपात करण्याचा निर्णय कंपन्यांकडून घेण्यात आला आहे. यामुळे कंपन्याकडून कामगारांची कपात करण्यात आली आहे. अनेकांना यामुळे रोजगार गमावावा लागला आहे.