मोदी सरकारनं 15 राज्यांमध्ये सुरू केली नवी स्कीम, 81 कोटी रेशन कार्डधारकांना मिळणार फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान म्हणाले की राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा म्हणजेच एनएफएसए (NFSA) लाभार्थ्यांना पौष्टिक तांदूळ प्रदान करण्यासाठी सरकारने 15 राज्यांपैकी एक-एक जिल्ह्यांत राइस फोर्टिफिकेशन (Rice Fortification) च्या पायलट योजनेची सुरुवात केली आहे. याअंतर्गत महाराष्ट्र, गुजरात आणि आंध्र प्रदेश या काही निवडक जिल्ह्यांमध्ये पौष्टिक तांदळाचे वितरण सुरू झाले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा म्हणजेच एनएफएसए अंतर्गत देशातील सुमारे 81 कोटी शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दिले जाते.

ओडिसा आणि उत्तर प्रदेशात लवकरच पौष्टिक तांदळाचे वितरण सुरू होईल. इतर राज्यांनाही लवकरात लवकर ते सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. लोह, फॉलिक अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन बी 12 असलेले पौष्टिक तांदूळ कुपोषण आणि अशक्तपणावर मात करू शकतात.

पासवान यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, पावसाळा सुरू होत आहे. हे लक्षात घेता, अन्न व सार्वजनिक वितरण विभाग आणि एफसीआय यांना पुढील चार महिन्यांत पुरेसे धान्य लवकरात लवकर मिशन मोडमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचता यावे, यासाठी आदेश देण्यात आले आहेत जेणेकरून पावसाळ्यात अन्नधान्याची कमतरता भासू नये.

रब्बी हंगाम 2020-21 मध्ये निश्चित केलेल्या खरेदी लक्ष्याअंतर्गत शेतकऱ्यांकडून गहू व धान्य खरेदी सुरू आहे. एफसीआयने 13 जूनपर्यंत 378.40 एलएमटी गहू खरेदी केला आहे. रब्बी हंगामात 116.24 एलएमटी धान्य खरेदीसह 2019-20 हंगामात आतापर्यंत एकूण 735.81 एलएमटी धान्य खरेदी करण्यात आले आहे.

पीएमजीकेवाय अंतर्गत एफसीआयद्वारे करण्यात आली धान्याची वाहतूक

14 जूनपर्यंत एफसीआयने 4274 रेल्वे रॅकमार्फत 119.67 लाख टन धान्य विविध राज्यात पाठविले असून त्यापैकी 4229 रेल्वे रॅकमध्ये 118.42 लाख टन धान्य गोदामांमध्ये उतरवण्यात आले. पीएमजीकेवाय अंतर्गत देण्यात आलेल्या 120 लाख टन धान्यापैकी 110.17 लाख टन धान्य सर्व राज्यांनी उचलले आहे.