8 कोटी लोकांना ‘फ्री’मध्ये गॅस सिलेंडर देण्यासाठी मोदी सरकारनं उचललं ‘हे’ मोठं पाऊल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या संकटामुळे देशात लॉकडाऊन सुरु आहे. याच दरम्यान देशात एलपीजी गॅसची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी युएईचे राज्यमंत्री आणि अबू धाबी नॅशनल ऑईल कंपनी (Adnoc) ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुलान अल जाबेर यांच्याशी आठवड्यात दुसऱ्यांदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील 8 कोटी लोकांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत उज्ज्वलाचे तीन सिलिंडर विनाशुल्क दिले जात आहेत.

उज्जवला सिलिंडर्सची कमतरता भासणार नाही
या बैठकीविषयी माहिती देताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री म्हणाले, कोरोना संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ऊर्जा क्षेत्रातील सहाकार्यासाठी धोरणात्मक काम करण्याचे ठरले आहे. भारताच्या विनंतीवरून जुबेर यांनी अबू धाबी नॅशनल ऑईल कंपनीकडून अतिरिक्त एलपपीजी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे कोरोनाच्या संकटात कोणत्याही अडथळ्याशिवाय 8 कोटी उज्ज्वला लाभार्थ्यांना तीन मोफत एलपीजी सिलिंडर्स पुरवण्यास मदत होणार आहे, अशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.

1 एप्रिल ते 30 जून या कालावधीत विनामूल्य सिलिंडर उपलब्ध
केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेतील सर्व ग्राहकांना येत्या तीन महिन्यांसाठी मोफत सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये 1 एप्रिल 2020 ते 30 जून 2020 पर्यंत विनामूल्य सिलिंडर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याचा फायदा 8 कोटी लाभार्थ्यांना मिळणार असून त्यांना 14.2 किलोचा सिलिंडर मोफत मिळणार आहे. यामध्ये आता एप्रिल 2020 सिलिंडरची किंमत लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. याद्वारे लाभार्थ्याला मोफत एलपीजी गॅस सिलिंडर खरेदी करता येणार आहे.