मोदी सरकार ५६ इंच छातीच्या गप्पा मारतं : शरद पवार

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीने आज नांदेड येथे संयुक्तरित्या पहिली प्रचार सभा घेतली. या सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते. या सभेत बोलताना शरद पवार म्हणाले, सीमेवर हल्ल्याच्या घटना वाढल्या असताना मोदी सरकार ५६ इंच छातीच्या गप्पा मारत आहे. हे सरकार देशाचे संरक्षण करू शकत नाही, असा दावा शरद पवार यांनी केला आहे.

जम्मू काश्मीर येथील पुलवामा हल्ल्याच्या पाश्वभूमीवर मोदींवर टिका करताना शरद पवार म्हणाले, हल्ल्याच्या शेकडो घटना घडत आहेत. यामध्ये मातृभूमीचे पुत्र शहीद होत आहेत. हे सरकार देशाचे संरक्षण करु शकत नाही. पुलवामामध्ये जवान शहीद होत असताना पंतप्रधान यवतमाळमध्ये प्रचार सभा घेण्यात मग्न होते.

त्याआधी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही मोदी सरकारवर टीका केली. या सरकारने मागच्या साडेचार वर्षाच्या काळात मोठ-मोठी आश्वासने देऊन जनतेला भुलविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता ‘बहुत हुआ जुमलो की मार आब बदलो मोदी सरकार’ असे जनताच म्हणत आहे. सरकार विरोधी वारे वाहायला सुरुवात झाली आहे. असे प्रतिपादन अशोक चव्हाण यांनी केले.
देशभरात भाजप विरोधात काँग्रेस समविचारी पक्षांची महाआघाडी करून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. या काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व मित्र पक्षांच्या महाआघाडीच्या प्रचाराचा नारळ नांदेड येथे फोडण्यात आला.