मोदी सरकारचा कारभार घटनेला पायदळी तुडवूनच, काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची खरमरीत टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सत्तेत आल्यापासून राज्यघटनेला पायदळी तुडवत कारभार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पक्षाचे मुख्यमंत्री, नेते व कार्यकर्त्यांना घटनेचे पावित्र्य राखण्याचा सल्ला द्यावा, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी खा. हुसेन दलवाई ( Congress leader Husain Dalwai) यांनी केली आहे.

संविधान दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संविधानाचे पावित्र्य राखण्याचा शहाजोगपणाचा सल्ला दिला आहे. घटना अस्तित्वात आल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांचा परिवार सोडता देशातील जनता घटनेचे पावित्र्य निष्ठेने सांभाळत आहे. घटनेच्या पावित्र्यासंदर्भात पंतप्रधानांचे वक्तव्य म्हणजे “लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः कोरडा पाषाण”, अशा प्रकारचे असल्याची टीका दलवाई यांनी केली आहे.

गेल्या सहा वर्षांतील मोदी सरकारचा कारभार पाहता त्यांनी स्वतः आणि देशाच्या विविध राज्यांतील भाजपचे मुख्यमंत्री संविधानाला हरताळ फासून हुकूमशाही वृत्तीने सरकारे चालवत आहेत. कोणी काय खावे? कोणी कोणता पेहराव करावा? कोणी कोणावर प्रेम करावे? आणि कोणी कोणाशी लग्न करावे? याचे स्वातंत्र्य घटनेने लोकांना दिले आहे. तो त्यांचा घटनादत्त अधिकार आहे. मात्र, भाजपचे नेते व विविध राज्यातील भाजपची सरकारे लोकांच्या खासगी बाबीत नाक खुपसून दररोज घटनेला पायदळी तुडवत आहेत. त्यांचे कान मोदी पकडत नाहीत, त्यामुळे या सर्वांना त्यांचा मूक पाठिंबाच असल्याचे दिसते असे ते म्हणाले.

घटनेच्या पावित्र्याच्या गप्पा मारायच्या आणि प्रत्यक्षात घटनेला सुरुंग लावायचा या स्वयंसेवक संघाच्या शिकवणीवर पंतप्रधानाचे वर्तन सुरू आहे. ते आता तरी थांबवणार आहेत का? नरेंद्र मोदी यांना खरेचच घटनेच्या पावित्र्याची काळजी असती, तर दररोज घटनाविरोधी वक्तव्ये आणि कृत्ये करणाऱ्या आपल्या पक्षाची सरकारे व नेत्यांवर त्यांनी काहीतरी कारवाई केली असती. प्रत्यक्षात मोदी स्वतःही घटनेचे पावित्र्य राखतात असे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत दिसले नाही. त्यामुळे मोदींचे खायचे दात आणि दाखवायचे वेगळे आहेत हे पुन्हा एकदा दिसून आले आहे, असा टोला दलवाई यांनी लगावला आहे