गरीब-कामगारांसाठी सरकारची मोठी घोषणा ! 3 महिने गहू, तांदूळ, डाळीसह मोफत गॅस ‘सिलिंडर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. याचा परिणाम भारतात देखील दिसू लागला आहे. याच दरम्यान भारत सरकारने 1 लाख 70 हजार कोटी रुपयाच्या पॅकेजची घोषणा केली आहे. पंतप्रधान गरीब योजनेचा गरीब आणि मजुरांना याचा मोठा फायदा होणार आहे.
याचबरोबर आरोग्य विभागात काम करणाऱ्यांसाठी 50 लाख रुपयाच्या विम्याची घोषणा करण्यात आली असून याचा 20 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच गरिब-मजुरांसाठी गहू, तांदुळ, डाळ मोफत देण्याची घोषणा करण्यात आली.

अर्थ मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे
1. तीन महिन्यापर्यंत 5 किलो गहू किंवा तांदूळ मोफत देणार. याचा फायदा 80 कोटी लोकांना होणार
2. प्रत्येक गरीब कुटुंबासाठी पुढील तीन महिने 1 किलो डाळ मोफत मिळणार
3. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा करण्यात येणार. देशातील 8 कोटी 70 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल
4. मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ, मजुरांच्या दैनंदिन वेतनात 200 रुपये वाढणवण्याचा निर्णय.
5. ज्येष्ठ नागरिक, विधवा महिलांच्या मदतीसाठी एक हजार रुपये अतिरिक्त मिळणार आहेत. ही रक्कम दोन हप्त्यांमध्ये देण्यात येईल. याचा फायदा 3 कोटी ज्येष्ठ, विधवा आणि अपंग लोकांना होईल. हे सर्व पैसे डीबीटीमार्फत त्यांच्या खात्यात जातील.
6. पंतप्रधान जनधन खात्यातील महिलांच्या खात्यात दरमहा 500 रुपये हस्तांतरित केले जातील. याचा फायदा 20 कोटी जनधन महिलांना होईल.
7. उज्जवला योजनेंतर्गत पुढील तीन महिन्यांपर्यंत मोफत स्वयंपाक गॅस मिळणार.
8. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत ईपीएफ योगदानची भरपाई केली जाईल. पीएफ योगदान कंपनीच्या 12 टक्के आणि कर्मचारी 12 म्हणजे 24 टक्के सरकार पैसे देईल. पुढील तीन महिन्यांपर्यंत ईपीएफ सरकार भरेल. 100 कर्मचारी असलेल्या कंपन्यांना याचा फायदा होणार.
9. तसेच पीएफची रक्कम काढण्यासाठी अटींमध्ये शिथिलता जाहीर केली आहे. कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्यातून 3 महिन्यांचा पगार किंवा 75 टक्के रक्कम काढू शकतील. याचा 8 कोटी 8 लाख लोकांना फायदा होईल.