काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थोरातांचा केंद्रावर घाणाघाती हल्ला, म्हणाले – ‘देशाच्या सीमांचे रक्षण करण्यात मोदी सरकार अपयशी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चीनला प्रत्युत्तर देण्यात सरकार अपयशी ठरल्याचे सांगत कॉंग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सीमेवर जे काही घडत आहे त्यावरून आपले परराष्ट्र धोरण चुकीचे असल्याचे दिसते. आजपर्यत आपण चीनला रोखले होते पण आज परिस्थिती वेगळी आहे आणि मोदी सरकार सीमांचे रक्षण करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत म्हटले आहे. काँग्रेसने आज सरकारला या नाकर्तेपणाचा जाब विचारण्यासाठी आणि 20 शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन केले. आज सकाळी बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह मुंबईत मंत्रालयाजवळ महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर शांततेत आंदोलन केले. राज्यव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून ‘शाहिदों को सलाम’ दिवस देखील साजरा करण्यात आला. राज्यव्यापी आंदोलनाबरोबरच #SpeakUpforOurJawans ही ऑनलाईन मोहीम देखील राबिवण्यात आली.

दुपारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी चव्हाण यांनी चीनच्या घुसखोरीबाबत मोदी सरकारकचा कडक शब्दांत समाचार घेतला. चीनची लडाखमधील घुसखोरी ही चिंतेची बाब आहे. देशाच्या हितासाठी सरकारने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला कॉंग्रेस समर्थन देईल परंतु चीनने भारतीय भूमीत घुसखोरी केलीच नाही, हे पंतप्रधान मोदींचे वक्तव्य चीनला अनुकूल असल्याचे सिद्ध झाले आणि त्याचा मोठा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर झाला. मोदींनी केलेल्या वक्तव्याचा चीनने पूर्ण फायदा घेतला असून चीनने घुसखोरी केलीच नाही असे चीन जगभर सांगत सुटला आहे. कॉंग्रेसला पंतप्रधानांचे हे विधान मान्य नाही. दरम्यान पंतप्रधान कार्यालयाने यावर सारवासारव करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असला तरीही तेवढे पुरेसे नसून सरकारने याबाबत खुलासा करावा. पंतप्रधानांनी अशा गंभीर प्रश्नावर अत्यंत जबाबदारीने व गांभीर्याने बोलले पाहिजे, परंतु तसे झाले नाही. विरोधकांचे काम असते सरकारला प्रश्न विचारणे आणि त्याचे उत्तर देणे हे सरकारचे घटनात्मक कर्तव्य आहे.

दरम्यान चव्हाण म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात सहा वर्षांत 19 वेळा झालेल्या बैठकीचा भारताला मुळीच फायदा झाला नाही. तसेच चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केले की, भारताच्या हद्दीत एप्रिल, मे 2020 मध्ये चीनने किती वेळा आक्रमण केले ? सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांनी असे वादग्रस्त विधान का केले ? पंतप्रधानांच्या वक्तव्यामुळे वाटाघाटीतील भारताची भूमिका कमकुवत झाली का ? सीमा परिस्थिती सामान्य स्थितीत आणण्यासाठी भारत सरकारने कोणती उपाययोजना केली ? मोदी सरकारने या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. चीनने सीमावर्ती भागात कुरघोड्या करणे थांबवलेले नाही. काही गोष्टी सॅटेलाईटच्या माध्यमातून स्पष्ट झाल्या आहेत आणि त्यात समोर आले की चीन गलवान परिसरातून अजून देखील परत गेलेला नाही. त्याऐवजी या भागात चिनी सैन्याच्या चौक्या उभारल्या असून सैनिकी वाहने ये-जा करीत आहेत. या भागात सुमारे 10,000 सैन्य तैनात असून मोठा तोफगोळाही तेथे असल्याचे दिसून येत आहे. तसेच चीन गलवान खोऱ्यात बांधकाम देखील करत आहे. असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.