चुकीला माफी नाही ! नरेंद्र मोदींचे ‘तिच्या’कडे ‘दुर्लक्ष’

नवी दिल्ली : यंदाची लोकसभा निवडणूक चांगलीच रंगली. अनेकांना धक्के बसलेत. तर भोपाळमधील भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी लोकसभेच्या प्रचारासाठी अनेकवेळा वादग्रस्त विधाने केली. त्यामुळे भाजपला अनेक अडचणींचा सामनाही करावा लागला. त्यावर मात करत भाजपने बाजी मारली. त्यानंतर शनिवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवनिर्वाचीत खासदारांचे अभिनंदन केले. तेव्हा प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याकडे मोदींनी साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे मोदींनी अद्यापही प्रज्ञासिंह ठाकूर यांना माफ केले नाही हे दिसून येते. तशी चर्चाही राजकिय वर्तुळात रंगली आहे.

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केलीत. शहीद हेमंत करकरे, बाबरी मस्जिद आणि नथुराम गोडसेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून भाजपवर मोठ्याप्रमाणात टीका करण्यात आली होती. तेव्हा प्रज्ञासिंह ठाकूर यांनी माफी सुद्धा मागीतीली होती. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी माफी मागितली असली तरी, मी त्यांना मनापासून कधीच माफ करणार नाही, असं मोदींनी त्यावेळी म्हटलं होते. तोच शब्द मोदींनी पाळल्याचे यावेळी बैठकीला दिसून आले.

दरम्यान, मोदींनी एनडीएच्या नेतेपदी निवड झाली. त्यानंतर त्यांनी सर्व खासदारांचे अभिनंदन केले. त्यावेळी मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर सर्व खासदारांनी त्यांचे अभिनंदन केले. त्याचवेळी साध्वींनी मोदींना अभिवादन केलं. मात्र, मोदींनी त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. त्यामुळं मोदींनी साध्वींना अजूनही माफ केलं नाही, अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.