‘मोदींचा विषय नाही, सुजय विखेंना पाहून मतदान करा’

विखेंच्या कार्यकर्त्यांची मतदारासोबत संभाषणाची क्लिप व्हायरल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – ‘मोदींचा विषय नाहीये, सुजय विखेंना पाहून मतदान करा’, अशी विनंती करणाऱ्या कार्यकर्त्यांची मोबाईल संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे विखेंचे कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा सुजय विखे यांना मोठे मानतात का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या ‘क्लिप’मुळे भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. याचा मोठा फटका अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या मतदानात विखे यांना बसण्याची शक्यता आहे.

विखे समर्थकांकडून भेटीगाठी, भ्रमणध्वनीवरून संपर्क करून नगर लोकसभा मतदारसंघात मतदारांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. अशाच एका मोबाईल संभाषणाची ‘ऑडिओ क्लिप’ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. विखेंचे कार्यकर्ते मतदान करण्याचे आवाहन करीत असताना समोरून बोलणारी व्यक्ती ही ‘मोदी यांनी शेतकऱ्यांची वाट लावली. तुम्ही शेतकरी आहात तुम्ही सांगा शेतकऱ्याची काय अवस्था आहे? 15 लाख कुठे गेले? अच्छे दिन कुठे गेले?’ अशा प्रश्नांची सरबत्ती केली.

मोदी यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पक्षाला मतदान देता येणार नाही, असे सांगितले. समोरचा मतदार बोलत असताना विखे यांचा कार्यकर्ता मतदान करण्याचे आवाहन करीत होता. शेवटी विखे यांचा कार्यकर्ता ‘मोदींचा विषय नाहीये, सुजय विखे यांना मतदान करा. त्यांच्याकडे पाहून मतदान करा’, अशी विनंती करीत होता.

त्या वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा विखे समर्थकांना सुजय विखे मोठे वाटतात का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. समर्थकांकडून पंतप्रधान मोदी यांना दुय्यम स्थान दिल्याच्या चर्चेने भाजपचे मूळ कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यामुळे विखे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

वेगवेगळ्या व्हिडिओ, ऑडिओ क्लिपमुळे गेल्या काही दिवसांपासून सुजय विखे पाटील हे सोशल मीडियावर चांगलेच ‘ट्रोल’ होत आहेत आता पुन्हा नवीन संभाषणाची क्लिप आल्याने विखे गोटात अस्वस्थता पसरली आहे.