रोड शोमध्ये मोदींच्या घोषणा देणाऱ्यांना प्रियंका गांधी यांनी दिले असे प्रत्युत्तर

बिजनौर (उत्तर प्रदेश) : वृत्तसंस्था – काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय झालेल्या प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात पक्षाचा प्रचार करीत आहेत. आज प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे रोड शो केला. रोड शो दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. मात्र प्रियंका गांधी यांनी या घोषणाबाजी करणाऱ्यांवर फुलांचा वर्षाव करत त्यांच्या विरोधाचेही स्वागत केले.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार संपण्यासाठी आता काही तासांचा अवधी राहीला आहे. दरम्यान, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच दिग्गज नेत्यांनी आपापली शक्ती पणाला लावली आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या आज बिजनौर येथील काँग्रेस उमेदवार नसिमुद्दीन सिद्दीकी यांच्या प्रचारार्थ रोड शो केला. यावेळी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले. त्यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चौकीदार चोर है च्या घोषणा दिल्या तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदी-मोदीच्या घोषणा देत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर दिले. यामुळे या ठिकाणी काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, प्रियंका गांधी यांनी प्रसंगावधान राखत मोदींच्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांवर फुलांची उधळ करून आणखी घोषणा द्या, असा टोला लगावला.

उत्तर प्रदेशमधील बिजनौर लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. याठिकाणी काँग्रेसने सिद्दीकी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना भाजपचे कुंवर भारतेंद्र सिंह आणि बसपाचे मलूक नागर यांच्याशी होणार आहे.