Coronavirus : राज्यातील उपाययोजनांवर देखरेख करण्यासाठी PM मोदींकडून गडकरींवर जबाबदारी

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोना आजारावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन होते किंवा नाही तसेच केंद्राकडून अधिक मदतीची गरज आहे काय, याबाबत राज्यातील विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधून खात्री करून घ्यावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राज्यातील स्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात पत्रक प्रसिद्धीला दिले आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना राज्यातील करोना स्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. त्यानुसार गडकरी यांनी राज्यातील 17 जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधला व कोरोनामुळे देशभरात उद्भवलेली समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकार जनतेच्या व अधिकार्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा संदेश दिला. राज्यातील संपूर्ण यंत्रणा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात करोनावर मात करण्यासाठी मागील दोन आठवड्यांपासून दिवसरात्र प्रयत्न करीत आहे. खुद्द ठाकरे यांचे पंतप्रधानांशी वेळोवेळी दूरध्वनीवरून बोलणेही झाले आहे. असे असताना मोदी यांनी राज्य सरकारच्या मदतीने केंद्राच्या उपाययोजनांचा आढावा घेण्याऐवजी गडकरी यांच्याकडे ही जबाबदारी सोपवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकप्रकारे राज्यसरकारला बाजूला सारून केंद्रच करोनाच्या उपायोजना राबवत आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.