२०२२मध्ये प्रत्येक कुटुंबाकडे असेल हक्काचे घर : मोदी

गांधीनगर : वृत्तसंस्था

२०२२ मध्ये जेव्हा आपण ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असू तेव्हा देशातील प्रत्येक कुटुंबाकडे पंतप्रधान आवास योजनेतून राहण्यासाठी हक्काचे घर असेल. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बनणारी घरे उत्तम दर्जाची आहेत. या घरांसाठी कुणालाही एक रुपयाची लाच देण्याची गरज नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये केले. मोदी गुरूवारी गुजरातच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी एका रॅलीत ते बोलत होते.

मोदी म्हणाले, माझ्या सरकारमध्ये मध्यस्थांना कोणत्याही प्रकारचा थारा नाही. जो पैसा केंद्राकडून दिला जातो, त्यातील पै न पै गरिबांपर्यंत पोहोचते. केंद्राने गरिबांसाठी एक रुपया पाठवला तर गरिबांपर्यंत केवळ १५ पैसेच पोहोचतात. मध्यस्थांमुळेच असे प्रकार घडतात; असे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी एकदा म्हटले होते. त्याचे स्मरण करून देत मोदी यांनी हे वक्तव्य केले.

[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9546cbf7-a74f-11e8-b0a0-05824187c05d’]

आता दिल्लीतून १०० पैसे पाठवले तर गरिबांपर्यत संपूर्ण १०० पैसे पोहोचतात. कारण माझ्या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारच्या मध्यस्थांना थारा नाही. त्यामुळेच सर्वच्या सर्व रक्कम थेट गरिबांपर्यंत पोहोचते, असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर नाव न घेता टीकास्त्र सोडले.

रॅलीनंतर गुजरातच्या फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठाच्या चौथ्या दीक्षांत समारंभाला मोदी उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमात मोदी म्हणाले, गुन्हे रोखण्यासाठी फॉरेन्सिक सायन्सची भूमिका सर्वात महत्वाची आहे. गुन्हेगारी प्रकरणात न्यायदान करताना पोलीस, फॉरेन्सिक सायन्स आणि न्यायपालिकेची भूमिका महत्वाची असते. या तिन्ही बाबी या व्यवस्थेच्या प्रमुख आधार स्तंभ आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.