‘PM मोदी – HM शहा’ जोडगोळीची जादू संपली ? मुठभर वाळुसारखी काही राज्यांतील ‘सत्ता’ हातातून सुटतेय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणी गुप्त पद्धतीने न करता ऑन कॅमेरा करण्याचे आदेश दिले आणि राज्यातील भाजप सरकार कोसळले. अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर बहुमत उरलेले नसल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि भाजप सरकार कोसळले. इतर राज्यांमध्ये भाजपने ज्या प्रमाणे फोडाफोडी केली त्या प्रमाणे भाजपला महाराष्ट्रात ते करता आले नाही त्यामुळे हा मोदी-शहा यांचा मोठा पराभव असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. इतक्या दिवस महाराष्ट्र हा भाजपचा गड म्हणून ओळखला जात होता. मात्र आता भाजपला विरोधात बसावे लागल्याने मोदी-शहा यांचा करिष्मा संपला आहे का ? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

केंद्रात पहिल्यांदाच 303 खासदारांसह निवडून आलेल्या भाजपला महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये म्हणावे तसे यश मिळाले नाही. हरियाणात भाजपने दुष्यंत चौटाला यांच्या सोबत सरकार तर स्थापन केले परंतु हे सरकार कधीपर्यंत टिकेल याची खात्री नाही. महाराष्ट्रात देखील भाजपने शिवसेनेशी युती केली होती मात्र मुख्यमंत्री पदावरून वाद झाल्याने भाजपला विरोधात बसावे लागले.

2014 नंतर भाजपने मोदी-शहा यांच्या नेतृत्वाखाली देशातील 70 % भागात यश मिळवत भाजपचे सरकार स्थापन केले होते. मात्र आता ही आकडेवारी 40 % पेक्षाही कमी झालेली आहे. ज्या वेगाने भाजपला यश मिळत होते त्याच वेगाने भाजपच्या पराभवाला देखील सुरुवात झाली आहे.

भाजपच्या विजयी रथाला अडवण्याचे काम सर्वात आधी 2017 मध्ये पंजाबमधील काँग्रेसच्या अमरिंदर यांनी केले. अमरिंदर यांनी पंजाबमध्ये भाजपला ज्या पद्धतीने अडवले होते त्याच पद्धतीने महाराष्ट्रात शरद पवार यांनी भाजपला अडवले आहे. 2017 ते 2019 मध्ये भाजपला पंजाब, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान आणि महाराष्ट्रात नामुष्कीचा सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आता मोदी-शहांचा करिष्मा संपत आल्याचे समजते.

तीन तलाक आणि कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय हे सुद्धा भाजपला हरियाणा आणि महाराष्ट्रात वाचवू शकले नाही. येत्या विधानसभेसाठी झारखंडमध्ये देखील भाजप एकटे लढत आहे. तसेच आगामी काळात दिल्ली, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये देखील भाजपला मोठा संघर्ष करावा लागणार आहे. विशेष म्हणजे या तीनही राज्यांत स्थानिक पक्ष आपली मजबुती वाढवत आहेत. दिल्लीमध्ये केजरीवाल आणि बंगालमध्ये ममता बॅनर्जी जर आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी झाले तर भाजपला हा मोठा झटका असेल.