लोकांचे बोलणे ऐकण्याची हिम्मत मोदींमध्ये नाही : राज ठाकरे

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यास काही कालावधी बाकी असताना काल भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांच्या एकही प्रश्नाचे उत्तर दिले नाही.

त्यावरून देशभरात त्यांच्यावर टीका होत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. पाच वर्षात एकही पत्रकार परिषद न घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी प्रचार संपताना झालेल्या पत्रकार परिषदेला आलेच कशाला? जर अमित शाह हेच सगळं बोलणार होते तर मग मोदींनी गेलेच का? त्यांनी मानसिक पराभव मान्य केला आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांचा मानसिक पराभव झाल्याचे देखील यावेळी राज ठाकरे म्हणाले.

या लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचा एकही उमेदवार उभा न करता राज ठाकरेंनी मोदी आणि शहा या जोडगोळीविषयी मोठ्या प्रमाणात प्रचार केला. मोदी आणि शाह यांना हटवा हे सांगत त्यांनी प्रचार केला. त्यांनी यासाठी संपूर्ण राज्यात १० मोठ्या सभादेखील घेतल्या. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी इतक्या दिवस दादागिरीच केली. मात्र प्रत्यक्ष उत्तरं देण्याची वेळ आल्यावर मात्र त्यांनी त्यातून पळ काढला.

पश्चिम बंगालमधील हिंसाचार

मंगळवारी अमित शहा यांच्या रॅलीत झालेल्या हिंसाचाराविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले कि,पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जे करत आहेत ते योग्यच आहे. या दोघांनी इतक्या वर्ष दादागिरी केली, आता ममतादीदींनी केल्याने काय बिघडले? शनिवारी सकाळीही मोदींची पत्रकार परिषद म्हणजे मन की बात नाही तर मौन की बात होती असं ट्विटही राज ठाकरेंनी केलं होतं.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या या टीकेवर भाजपकडून काय प्रत्युत्तर येते,हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.